जिल्हा क्रीडा संकुलातील सिथेटींक ट्रकसाठी 5 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले असून 400 मीटरचा हा ट्रक तयार करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून अत्याधुनिक बहुउद्देशीय व्यायामशाळा (जिम) उभारण्यासाठी 30 लाख रुपये निधी मंजूर करण्यात येतील. तसेच क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावली जातील. यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव तयार करावेत असे आदेश क्रीडा विभागाला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात खेलो इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल व इतर विषयांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलातील बॅटमिंटन हॉल, स्विमींग पुल यांच्या नुतनीकरणाची कामे करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. खेलो इंडिया अंतर्गत येणाऱ्या बाबींचे प्रस्ताव केंद्र शासनास तर जिल्हा क्रीडा संकुला संबंधातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात यावेत. जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात तालुका स्तरावर तालुका क्रीडा संकुलांची कामे मार्गी लावण्यासाठी क्रीडा विभागाने प्रत्येक तालुक्यात भेट देवून तेथील अडचणी सोडवाव्यात. जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, नवनवीन खेळाडू तयार व्हावेत, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावली जातील. तसेच पावसाळ्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलातील रंगरंगोटीचे कामेही तातडीने पूर्ण करावीत. जिल्हा क्रीडा संकुलातील कामांबाबत राज्य शासनाच्या परवानग्या आवश्यक आहेत. त्या सर्व मिळवून दिल्या जातील. त्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करु असेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
*सोबत फोटो जोडला आहे.
00000