कुडाळ /-
‘नाजूक’ विषयाबाबत जाब विचारला म्हणून विदयार्थ्यांच्या भावाने शिक्षकाच्या ‘श्रीमुखात’ भडकावली.कुडाळ येथील ‘एका’ पंचक्रोशीतील एका महाविद्यालयातील शिक्षकाने आज महाविद्यालयातीलच विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. मात्र त्यानंतर झालेल्या प्रकाराने संपूर्ण शिक्षण विभाग हादरला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे कि,कुडाळ मधील एका पंचक्रोशितील एका महाविद्यालयात आज सकाळी पहिल्या गाडीने येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला महाविद्यालयातीलच एका शिक्षकाने अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. सदर विद्यार्थी आणि विद्यर्थिनी हे बारावी कॉमर्समध्ये शिकत असून शिक्षकाने विद्यार्थ्याला त्याच्या पालकांना बोलावण्यास सांगितले. म्हणून त्याने आपल्या भावाला फोन करून त्याठिकाणी बोलावले. काही वेळातच सदर विद्यार्थ्याचा भाऊ महाविद्यालयात दाखल झाला. मात्र त्याने सदर प्रकाराबाबत शहानिशा न करताच शिक्षकाच्याच ‘श्रीमुखात’ भडकावली.
दरम्यान या प्रकारानंतर महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी एकत्र येत कोणत्याही तासिका न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. ‘त्या विद्यार्थ्याला जोपर्यंत महाविद्यालयातून काढून टाकले जात नाही आणि त्याच्या भावावर या प्रकरणी रीतसर कारवाई केली जात नाही तोपर्यंत ‘ अशाप्रकारे आंदोलनात्मक पद्धतीने निषेध करण्याचे ठरविले आहे. याप्रकरणी सर्व शिक्षकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याची भेट घेत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकारातील सदर विद्यार्थाला ‘ भावकीच्या ‘ नात्यातून वाचवण्याचा प्रकार होण्याची दाट शक्यता असल्याने शिक्षकांनी हा पवित्रा घेतल्याचे समजते. तसेच येथील स्थानिक जि. प. सदस्यही या प्रकरणात सारवासारव करण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.