४६८लाभार्थ्यांना होणार लाभ ..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत ४६८ लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागामार्फत मुली व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देणे योजनेअंतर्गत फळप्रक्रिया, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये फळप्रक्रिया प्रशिक्षणासाठी ९० लाभार्थींची निवड करून प्रत्येक लाभार्थी साठी ३३०० रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी ३ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. फॅशन डिझाइनिंग प्रशिक्षणासाठी ८५ लाभार्थींची निवड करण्यात आली असून प्रत्येकी ३५०० रुपये अनुदान खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी ३ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी १०० लाभार्थींची निवड करण्यात आली असून प्रत्येक लाभार्थी ३००० रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी ३ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व लाभार्थ्यांना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सभापती माधुरी बांदेकर यांनी दिली. महिलांना विविध साहित्य पुरवणे योजनेअंतर्गत पिठाची गिरण (घरघंटी), शिलाई मशीन (शिवण यंत्र), व पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल पुरवणे या योजना राबविण्यात आल्या आहेत .यामध्ये घरघंटी पुरवणे योजनेसाठी ८५ लाभार्थींची निवड करण्यात आली असून प्रति लाभार्थी १२,६०० रुपये अनुदान खर्च करण्यात येणार आहे. या योजनेसाठी १८ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना शिलाई मशीन पुरवणे योजनेमध्ये ६८ लाभार्थींची निवड करण्यात आली असून प्रति लाभार्थी ५,३२५ रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल पुरवणे योजनेसाठी ४० लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थी साठी ३,८०० रुपये निधी खर्च करण्यात येणार असून त्यासाठी ६ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे विविध योजनांसाठी ३८ लाख निधीची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत ४६८ लाभार्थी निवड करण्यात आली असल्याची माहिती सभापती माधुरी बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर अद्यापही सायकल पुरवणे व एमएस-सीआयटी प्रशिक्षणासाठी प्रस्तावांची आवश्यकता असून गरजू लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन सभापती माधुरी बांदेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page