कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त निर्णय..
कुडाळ /-
लॉकडाऊननंतर सर्वसामान्य जनतेची, उद्योजकांची, नवउद्योजकांची परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती आहे. शासन-प्रशासनाने मदतीचा ठाम हात देण्याची गरज आहे. पण सामान्य माणसांसाठी केवळ आश्वासनांची आणि मोठमोठ्या योजनांच्या घोषणांची गाजरेच वाट्याला येत आहेत. प्रत्यक्षात मात्र पूर्वी कर्जदारांची लूटमार वित्तसंस्थांकडून होत होती, आता दरोडेखोरी होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात आत्महत्या होण्याची वेळ येण्याची वाट आम्ही पाहणार नाही, अन्याय जिथे होईल तिथे पूर्वीच्याच “स्टाईल”ने रस्त्यावर उतरून आता उत्तर देऊ, अशा भावना संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे यापुढे कर्जदार आणि जामिनदार यांच्यावरील अन्यायाविरुद्ध त्याच ताकदीने मैदानात उतरणार आणि अन्यायकर्त्याना रोख प्रत्युत्तर देणार असे प्रतिपादन ॲड.प्रसाद करंदीकर यांनी केले.
महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीतर्फे ॲड. प्रसाद करंदीकर यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेक नवे जुने कार्यकर्ते येथे उपस्थित राहिले. मधल्या काळात काहीसे शिथिल झालेले काम पुन्हा नव्या जोशाने सुरू करण्याचा निर्णय उपस्थित सर्वांनी एकमताने घेतला. सध्या समाजात सुरू असलेले खाजगी सावकार, बँका, फायनान्स कंपन्या, केरळी मायक्रो फायनान्स कंपन्या यांचे अनेक व्यवहार संशयास्पद व धोकादायक आहेत. अनेक भयानक गैरप्रकारांची या सभेत उदाहरणासह चर्चा करण्यात आली. याबद्दल सभेत उद्वेग व संताप व्यक्त करण्यात आला. असे प्रकार यापुढे जिल्ह्यात कुठेही घडू न देण्याचा निर्धार करत मजबूत संघटना बांधण्यासाठी चर्चा विनिमय करण्यात आला.भविष्यात वसुलीसाठी गैरप्रकार करणाऱ्यांना मजबूत चाप या संघटनेमुळे लागणार असल्याने समाजातील अनेकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
या बैठकीला संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष ॲड प्रसाद करंदीकर, बाप्पा मोचेमाडकर, संदेश मोचेमाडकर, रौनक पटेल, सादिक डोंगरकर, गुरू कांबळे, अविनाश पराडकर, कमलेश चव्हाण, दीपक कुडाळकर, राजेश माने, मिलिंद केळुसकर, समीर आचरेकर, राजेश साळगावकर, विकी मसुरकर, गीतेश शेणई दीपक घाडी, चेतन चांदोसकर ,सुभाष देवरूखकर, संजय सावंत, दीपक घाडी, तसेच महीला कार्यकर्त्या सौ. प्रमिला देवरूखकर, सौ नम्रता पवार, पूजा तावडे, सौ दिव्या साळगावकर यासह अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.