आनंदवली शिवारातील वापरात नसलेल्या इमारतीत दोन मित्रांनी दारुची पार्टी केली. मद्यधुंद अवस्थेत एकाने मोठा दगड उचलून डोक्यात टाकून दुसर्यास ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास घडली. दत्तनगर, चुंचाळे येथील महेश विष्णू लायरे (वय २९) असे ठार झालेल्याचे नाव आहे. शिवशक्ती चौक, सिडको येथील रुपेश छोटुलाल यादव (वय ३६) असे खून करणार्याचे नाव आहे.
गंगापूररोडवरील एका वाइन शॉपमधून मंगळवारी संशयित आरोपी रुपेश यादव याने त्याचा मित्र महेश लायरे याच्यासोबत मद्य खरेदी केले. आनंदवली शिवारातील इमारतीत दोघेही जाऊन बसले. तेथे मद्याची नशा झिंगल्यानंतर दोघांनी भांडण केले. संशयित रुपेश याने मनात राग धरुन महेशच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल पथकासह टनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित रुपेश यास अटक केली. इमारतीमध्ये अंधारात पडलेला मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला. याप्रकरणी संशयित रुपेशविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.