मालवण/-
राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी केली असून कोट्यवधी रुपयांच्या मत्स्यधनाची लूट ते करत आहेत. पंधरा ते अठरा वावात हायस्पीड ट्रॉलर्सचा लखलखाट रात्रीच्या वेळी दिसून येत आहे. मत्स्य विभागाची गस्तीनौका मात्र अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण परतवून लावणार कोण? असा सवाल पारंपरिक मच्छीमार करत आहेत.
यासंदर्भात पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी आज सहाय्यक मत्स्य आयुक्त भादुले यांची येथील कार्यालयात भेट घेऊन गस्ती नौकेबाबत विचारणा केली असता येत्या तीन-चार दिवसांत गस्ती नौका कार्यान्वित होईल, अशी ग्वाही मत्स्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून दिली. पराडकर म्हणाले, ‘‘मत्स्य हंगाम आता कुठे सुरू होतोय न होतोय तोवर शेकडोच्या संख्येने आलेले परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमारांच्या तोंडचा घास पळवून नेत आहेत.
स्थानिक मच्छीमार गिलनेट पद्धतीची पारंपरिक मासेमारी करायला गेले असता त्यांना समुद्रात जाळी टाकणेही मुश्कील बनले आहे. परराज्यातील अवाढव्य हायस्पीड ट्रॉलर्सनी स्थानिक मच्छीमारांमध्ये दहशत निर्माण केली आहे. तरी शासनाने वेळीच पराराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण रोखणे गरजेचे आहे.