शालेय शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडे चौकशीसाठी केली तक्रार..
मालवण /-
पाच वर्षांपूर्वी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने निधन पावलेल्या पतीवर उपचारादरम्यान झालेल्या वैद्यकीय खर्चाच्या बिलांचे प्रस्ताव सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाकडे पाठविल्यानंतर अनेकदा वेगवेगळी कारणे काढून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शनपर माहिती मागवीत प्रस्ताव रखडवून त्या शिक्षिकेला शासन लाभापासून दूर ठेवण्याचा अश्लाघ्य प्रकार सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाने चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका प्रज्ञा प्रसाद कांबळी यांच्या बाबतीत शिक्षण विभागाने हा प्रकार सुरू केला आहे दुर्दैवाची बाब म्हणजे वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या कोल्हापूरच्या शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणी शिक्षण संचालकाकडे मार्गदर्शन मागविताना आपल्या पत्रात श्रीमती कांबळी यांच्या पतीवर ज्या हॉस्पिटलने उपचार केले त्या संबंधित हॉस्पिटलचे नाव चुकीचे नमूद केले आहे या प्रकरणी श्रीमती प्रज्ञा कांबळी आणि या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दाद मागितली आहे
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती प्रज्ञा प्रसाद कांबळी कार्यरत असून त्यांचे पती प्रसाद कांबळी हे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने आजारी होते .आर्थिक ओढाताण सहन करीत श्रीमती कांबळी यांनी त्यांच्यावर गोवा येथील मणिपाल गोवा कॅन्सर आणि जनरल हॉस्पिटल दोनापावला याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २७ मार्च २०१६ रोजी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर श्रीमती कांबळी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर श्रीमती कांबळी यांनी शासकीय नियमानुसार उपचाराला सहाय्यभूत होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेखाली दि. २२ ऑक्टोबर २०१६ आणि १७ एप्रिल २०१७ रोजी वैद्यकीय परिपूर्तीचे एकूण पाच प्रस्ताव सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केले. सर्व कागदपत्राची पूर्तता करूनही अध्याप चार वर्षे उलटूनही हे प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत.
याबाबत श्रीमती कांबळी यांनी तसेच भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी शिक्षण विभागाकडे वेळोवेळी संपर्क साधला असता वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याचे स्पष्ट करीत श्रीमती कांबळी यांचा प्रस्ताव रखडवून ठेवण्यात आल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आठ दहा दिवसांपूर्वी श्रीमती प्रज्ञा कांबळी यांना जे शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण संचालकांकडे या प्रकरणी मार्गदर्शन करण्याविषयी जे पत्र पाठविले होते त्या पत्रात कोल्हापूरच्या शिक्षण उपसंचालकांनी श्रीमती कांबळी यांच्या पतीवर गोवा येथील मणिपाल रुग्णालयात उपचार झाले असताना या हॉस्पिटलचे नाव डॉ. शुभा ज्योती मणीपल हॉस्पिटल, गोवा असे चुकीचे नमूद करून मार्गदर्शन मागविले आहे. वस्तुतः शासन मान्यता दिलेल्या खासगी रुग्णालयाच्या यादीमध्ये डॉ. शुभा ज्योती मणीपल हॉस्पिटल गोवा असे नाव नमूद नाही. त्यामुळे चुकीचे नाव नमूद करून शिक्षण उपसंचालकांनी श्रीमती कांबळी यांच्यावर एकप्रकारे अन्याय केला आहे. झालेला हा प्रकार चुकून घडला की जाणीवपूर्वक घडविला गेला याबाबत शंकाही श्री. विजय पाटकर यांनी व्यक्त करीत या संपूर्ण प्रकाराची चौकशी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.