पावशी येथे भातशेतीची केली पाहणी
कुडाळ /-
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या मागणी वरून कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हयात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. आज सकाळी आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार अमोल पाठक,कुडाळ तालुका कृषिअधिकारी रमाकांत कांबळी यांच्या समवेत कुडाळ तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीच्या पंचनाम्याचा आढावा पावशी गावात घेतला.तसेच पावशी गावातील भातशेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.भात शेती जमीनदोस्त झाली असून भाताला कोंब फुटले आहेत. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन पावसामुळे भात शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली होती.त्यानुसार कृषीमंत्री दादा भुसे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हयात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी आज तहसीलदार अमोल पाठक,कुडाळ तालुका कृषिअधिकारी रमाकांत कांबळी यांच्या समवेत कुडाळ तालुक्यातील शेतीच्या पंचनाम्याचा आढावा घेतला.
पावशी गावात भातशेतीच्या केलेल्या पाहणीवेळी त्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी,तलाठी यांना कुडाळ तालुक्यातील भात शेतीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आ.वैभव नाईक यांनी सांगितले.
नजर अंदाजानुसार कुडाळ तालुक्यातील 1436 शेतकऱ्यांच्या 726 हेक्टर जमिनीवरील शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.उर्वरित पंचनामे येत्या 5 ते 6 दिवसात पूर्ण केले जाणार आहेत.अशी माहिती यावेळी कुडाळ तालुका कृषिअधिकारी रमाकांत कांबळी यांनी दिली.
नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांना संयुक्त रित्या पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले.
यावेळी पावशी सरपंच बाळा कोरगावकर, तलाठी अरसकर,कृषी सेवक श्री सरंबळकर, शेतकरी बाबा तेली, सुदन तेली,राजेश शेलटे आदीसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.