✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला,अजय गडेकर.
आजची मुले उद्याचे देशाचे नागरीक आहेत. भावी पीढीमध्ये राष्ट्रभावना वाढीस लागणे, देशाच्या लोकशाहीचा परिचय होणे, लोकशाही बळगट करणे या उद्देशाने पायाभरणी भक्कम लोकशाहीची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही पद्धतीने संपूर्ण निवडूक प्रक्रिया कशी राबवली जाते, मतदान असे केले जाते याचा अनुभव वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा नं.1 शाळेतील मुलांनी या उपक्रमातून अनुभवला. निमित्त होते शालेय स्वराज्य सभा वार्षिक निवडूकीचे.शिक्षकांच्या संकल्पनेतून या उपक्रमा अंतर्गत मतदार , मतदार यादी, उमेदवार, निवडणूक पॅनल, मतपत्रिका, प्रत्यक्ष मतदान करण्याचे प्रात्यक्षिक, मतमोजणी, विजयी उमेदवारांचा शपथविधी इ. संकल्पना विद्यार्थ्यांनी अनुभवल्या. निवडणूक प्रगती पॅनल व संघर्ष पॅनल या दोन पॅनलमध्ये पार पडली. शाळेतील 100 मुलांनी मतदान केले. या निवडणूकीत प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. अखेर विजयी पॅनलने मंत्रीमंडळ स्थापन करून शपथविधी पार पडला. या अनुभवातून मुलांना एक वेगळीच अनुभूती अनुभवता आली.
शाळेने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परूळकर, अण्णा रेडकर व सदस्य, पालक तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ,गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी श्रीम.भाकरे , केंद्रप्रमुख अडूळकर यांनी अभिनंदन केले.
