▪️आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
अल्पवयीन मुलीस देवीच्या रानात घनदाट झाडीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे तसेच चारचाकी गाडी पीडित मुलीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने गाडीत बसवून गुंगीचे इंजेक्शन देऊन जबरदस्तीने दोन वेळा शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा आरोपी शिवाजी सिताराम म्हाडगुत रा. आंबेरी याची आज ओरोस येथील विशेष न्यायाधीश सौ एस.एस.जोशी यांनी एक लाख रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर, ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.
संशयिताने दिनांक १४/०३/२०२३ रोजी अल्पवयीन पीडित मुलीस देवीच्या रानात घनदाट झाडीत नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व ही बाब कोणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली तसेच दि.२४/०३/२०२३ रोजी अल्पवयीन पीडित मुलीचा चारचाकी वाहनाने पाठलाग करून, मुसके बांधून, हाता पायावर दोरीने बांधून कसले तरी इंजेक्शन देऊन तिला गुंगी आल्यावर तिच्याशी दोन वेळा शारीरिक संबंध ठेवल्याची फिर्याद कुडाळ पोलीस स्थानकात देण्यात आली होती. या प्रकरणी भा. द. वि कलम ३७६, ३७६(२)(ज), ३७६(२)(न), ३५४,३५४(अ)(१)(i),३५४(अ)(१)(iv),३५४(ड)(१)(i),३२८,३४१,३२३,५०६,३४ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांच्या पासून संरक्षण अधिनियमचे कलम ४,६,८,१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संशयित आरोपी शिवाजी सिताराम म्हाडगुत रा. आंबेरी यास दिनांक ११/०४/२०२३ रोजी अटक करून विशेष न्यायालयात हजर केल्यावर त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेली अधिक पोलीस कोठडीची मागणी विशेष न्यायालयाकडून अमान्य करून आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान आरोपी तर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून विशेष न्यायालयाने एक लाख रुपयांच्या सशर्त जामीनावर आरोपीची मुक्तता केली.
