मालवण /-
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मालवण तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी सोमवारी येथील तहसिल कार्यालयाला धडक दिली. यावेळी विविध ९ मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्या न सोडवल्यास पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होईल, असा इशारा देऊन आमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, अशी सूचना करण्यात आली.
याप्रसंगी अशोक सावंत, सुधीर धुरी, विनायक परब, दिलीप बिरमोळे, संतोष लुडबे, डॉ. जी. आर. सावंत, संजय शिंदे, संतोष परब, दिलीप गावडे, हेमंत पाडावे, रमेश नाईक, सदानंद चव्हाण, सुभाष बिरमोळे, प्रदीप नाईक साटम, श्रेयस फाटक, राहुल परब, महेश काळसेकर, संतोष धुरी, जयेंद्रथ परब, कु. समिधा लुडबे यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते. कोपर्डी हत्याकांडातील दोषी आरोपींच्या अपिलाची सुनावणी त्वरित करावी व आरोपींना फासावर लटकवावे, मराठा आरक्षण प्रवर्गातून नोकरी मिळविलेल्या व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा द्यावी लागणारी अट शिथिल करावी, सारथी संस्था पुन्हा पुनर्जीवित करावी, मराठा आंदोलकांवरील खटले त्वरित मागे घ्यावेत खास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील घटनेतील आरोपींवरील खटले मागे घेण्यात यावेत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना व पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल ४३ प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा सुरू कराव्यात, बिंदुनामावली घोटाळा करून खुल्या प्रवर्गातील जागा अडवून नसलेल्या उमेदवारांवर कारवाई करावी, पदोन्नतीतील आरक्षण देण्याबाबत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशांचे पालन करावे आणि मराठाद्वेष्ट्या वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.