मुंबई /-
अमरावती – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा आज चौथा दिवस असून, यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मात्र या संपाचा फटका लाखो बालकांना बसत आहे. कारण अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका-मदतनिस यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. दरम्यान, या काळात राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत.
माहितीनुसार, अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविका संपावर निघाल्या आहेत आणि यामुळे या जिल्ह्यातील १ लाख ३० हजार चिमुकले पोषक आहारापासून वंचित आहेत. तसेच, अमरावती जिल्ह्यातील २३६६ अंगणवाडी सेविका संपावर गेल्या आहेत. त्यामुळे २६४६ अंगणवाडी केंद्र सध्या बंद आहेत. दरम्यान, आज अमरावती शहरातून अंगणवाडी सेविकांचा भव्य मोर्चा निघणार असल्याचे समजते. मागण्या पूर्ण करा, अन्यथा आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असा आक्रमक पवित्रा या अंगणवाडी सेविकांनी घेतलेला आहे. आता या संपाची दखल शासकीय पातळीवर घेतली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.