लोकसंवाद /- कणकवली.
कणकवली तालुक्यातील सावडाव नं. १ शाळेतील सहा मुलांना मारुती ओमनी वाहनातून पळविण्याचा प्रकार झाल्याची माहिती सरपंच आर्या वारंग आणि इतर ग्रामस्थांनी दिली आहे. तर या घटनेच्या अनुषंगाने अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. यात त्या मारूती ओमनीचाही शोध घेतला जात आहे.
सकाळी दहाच्या सुमारास सावडाव नं. १ शाळेतील मुले घराकडून शाळेत जात असताना वाटेत एका ओमनी वाहनामध्ये त्यांना भरण्यात आले. त्यानंतर त्यांच्या तोंडाला लाल रंग किंवा पिंजर लावण्यात आली आणि वाहनातून त्यांना नेण्याचा प्रकार झाला. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर वाहनातील व्यक्तींनी त्यांना सोडून दिल्याची प्राथमिक माहिती त्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.
दरम्यान सकाळी साडे दहाच्या सुमारास डगरेवाडी शाळेतील एका शिक्षकांना रस्त्यावरून शाळेच्या गणवेशातील मुले पळताना दिसली. त्यांनी दुचाकीवरून पाठलाग करून त्यामुलांना थांबवले असता ही सर्व सहाही मुले शाळा नं. १ मधील असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधींना दिल्यानंतर डगरेवाडीमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस पथकाने सावडाव येथे धाव घेतली. यानंतर त्या मुलांसह ग्रामस्थांचाही जबाब घेण्यात आला. तसेच ती ओमनी कुठल्या मार्गाने जाऊ शकते याबाबतही तपास सुरू करण्यात आला • आहे. याखेरीज अन्य बाबीही तपासून पाहिल्या जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
