लोकसंवाद /- वैभववाडी.
वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला ४ जानेवारी सायंकाळपासून प्रारंभ झाला आहे. देव गांगेश्वरचा कौल घेऊन संपूर्ण गाव वेशीबाहेर आला आहे. पुढील काही दिवसांसाठी संपुर्ण गाव खाली झाले आहे. सडुरे येथील वाघपत्थर येथे या संपूर्ण गावचा मुक्काम असणार आहे. चारशे वर्षाची पंरपंरा असलेल्या शिराळे गावपळणला आजपासुन सुरूवात झाली. दरवर्षी होणाऱ्या शिराळे गावच्या गावपळणबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतुहल आणि उत्सकुता असते. चार पाच दिवस लागणाऱ्या साहीत्यांचे गाठोडे, पाळीव पशुपक्ष्यांसह आज तीन वाजल्यापासुन गावकऱ्यांनी राहुट्यांच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. कुटुंबातील कर्ती माणसे पशुपक्षी घेवुन राहुट्यांच्या द निघाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. तरं वयोवृध्द, लहान मुले आणि महिला वर्ग एसटी बसने राहुट्यांकडे पोहोचले. सांयकाळी सहा सात वाजेपर्यंत गावकरी राहुट्यांकडे येतच होते. संपुर्ण गाव एकत्र आल्यामुळे राहुट्यांनजीक एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. एरव्ही शांत असणारा हा भाग शिराळेवासीयांच्या वास्तव्याने गजबजुन गेला आहे. यापुढील चार ते पाच दिवस गावकरी येथेच वास्तव्य करणार आहेत. गावकऱ्यांनी आपल्यासोबत आणलेली गुरढोरे देखील येथेच वास्तव्य करणार आहेत. शाळा, अंगणवाडी देखील येथेच भरणार आहे. पाच दिवसांनंतर देवाला पुन्हा कौल लावून गावात जाण्याबाबत ठरवले जाते.
शिराळे गावपळण बद्दल आख्यायिका सांगीतली जाते. घोरीप करण्यासाठी आलेल्या घोरीप कुटुंबाचा गावकऱ्यांनी गैरसमजातुन वध केला. त्या घोरीप कुटुंबाने गावकऱ्यांना शाप दिला होता. त्यातुन गावाचे मोठे नुकसान होते. त्यानतंर गावकऱ्यांनी देवाकडे विचारणा केली असता देवाने गावकऱ्यांना काही दिवस गावाबाहेर राहण्यास सांगीतले. तिथंपासुन गावपळण सुरू असल्याचे सांगीतले जाते. मात्र गावपळण बद्दल काही लोकांचे मत वेगळे आहे. चारशे वर्षापुर्वी शिराळे गावात प्लेगची साथ आली होती. या साथीत अनेक जणांचे बळी गेले होते. त्यामुळे आणखी बळी जावु नये या हेतुने लोकांचे स्थंलातर करणे क्रमप्राप्त होते. त्यातुनच ही प्रथा सुरू झाली.