मुंबई /-
पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळय़ातील आरोपी पार्थ चॅटर्जींना तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून तसेच पक्षातून हटवले आहे. मी भ्रष्टाचाराचे समर्थन करीत नाही. दोषीला शिक्षा झालीच पाहिजे, अशी सडेतोड भूमिका ममता बॅनर्जी यांनी बुधवारी जाहीर केली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांनी पार्थ चॅटर्जींना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची कारवाई केली. दरम्यान, पार्थ यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ईडीने पाच किलो सोने आणि 27.90 कोटींची रोकड जप्त केली आहे.
पार्थ चॅटर्जींचा शिक्षक भरती घोटाळय़ातील सहभाग उघड झाल्यानंतर बंगालच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्थ यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी होऊ लागली होती. ईडीने पार्थ यांना पाच दिवसांपूर्वी अटक केली. ते सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. याचदरम्यान ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेत पार्थ चॅटर्जी यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून हटवले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार्थ यांना मंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. ईडीने मागील पाच दिवसांत पार्थ चॅटर्जी व त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घर आणि कार्यालयांची झडती घेऊन दोघांकडील सोन्याच्या दागिन्यांसह कोटय़वधीची रक्कम जप्त केली आहे.
10 खोक्यांमध्ये 500-2000ची बंडले; सोन्याच्या विटांचा ढीग
ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरी बुधवारी आणि गुरुवारी तब्बल 18 तास झडती घेतली. या छाप्यात 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची बंडले, सोन्याच्या विटा, पेन, बिस्किटे, ब्रेसलेट आदी कोटय़वधीचे घबाड सापडले आहे. तसेच 2600 पानांची कागदपत्रे हाती लागली असून त्यात पैशांची देवघेव, पार्थ आणि अर्पिता यांच्या मालमत्ता आदींचे रेकॉर्ड आहे. अर्पिताच्या दोन्ही घरांत 44 तास चाललेल्या झडतीत जवळपास 50 कोटींची रोख रक्कम आणि मोठय़ा प्रमाणावर सोने जप्त करण्यात आले आहे. ही सगळी संपत्ती पार्थ यांची असल्याचा दावा अर्पिताने केला आहे.