कुडाळ /-
सिंधुदुर्गचे सुपुत्र, ख्यातनाम उद्योजक, पत्रकार, नामांकित कलावंत आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व राजन सुरेश नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या राज्यस्तरीय “पर्यटन समिती” वर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०२२- २४ अशा दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी त्या संदर्भातील नियुक्तीपत्र दिले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही राज्यातील उद्योजकांची शिखर संस्था आहे. राज्यभरातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर तोडगा काढण्याचे काम ही संस्था करीत असते. या संस्थेचा सदस्य होणे ही उद्योग जगतात प्रतिष्ठेची बाब मानली जाते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने नव्यानेच “पर्यटन समिती” स्थापन केली असून महाराष्ट्र राज्यातील निवडक व्यक्तींची या समितीवर नियुक्ती केली आहे. प्रसिद्ध वास्तूविषारद संतोष तावडे हे या समितीचे अध्यक्ष असून जसवंत सिंग आणि दत्तात्रय भालेराव यांची सह अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनविषयक वाटचालीत राजन नाईक यांचे अमूल्य योगदान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्यांनी सादर केलेल्या चित्रफितीच्या सादरीकरणावरून केंद्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्याचे परदेशी सादरीकरण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट छायाचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल सिंधुदुर्गचे तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांच्या हस्ते राजन नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. ख्यातनाम साहित्यिक आरती प्रभू यांच्या वास्तव्याने प्रसिद्धीस आलेले कोंडुरा हे ठिकाण विकत घेऊन त्यांनी ते पर्यटनदृष्ट्या अप्रतिमरीत्या विकसित केले आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मानाच्या पर्यटन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल राजन नाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासात आणखी योगदान देण्याचा, पर्यटनाच्या माध्यमातून अधिक रोजगार निर्मितीचा, पर्यटनविषयक नवे उपक्रम राबवण्याचा आणि जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याचा तसेच जल पर्यटनाबरोबरच साहसी पर्यटनाला चालना देण्याचा मानस राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे.
