वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा आडारी येथील हेमंत रविंद्रनाथ कामत – आडारकर यांच्या गाभण गायीवर बिबट्याने हल्ला केल्याने ती मृत्युमुखी पडली. त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.गुरुवारी रात्री ७.३० वा. हेमंत आडारकर यांच्या घराच्या नजीक असलेल्या बागेत बिबट्याने गायीवर हल्ला केला,त्यामुळे ती मृत्युमुखी पडली. बिबट्याने गायीवर हल्ला करीत सुमारे १५-२० फूट फरफटत नेले.अन्य म्हैशी व गुरे घाबरुन पळाल्याने त्या सुदैवाने बचावल्या.याबाबत त्यांनी वनविभागाला माहिती देताच शुक्रवारी सकाळी वनपाल अण्णा चव्हाण, वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी भेट देत पंचनामा केला.यावेळी हेमंत आडारकर, रविंद्र आंगचेकर, वासुदेव गवंडे, रविंद्र हळदणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या भागात व नजीकच्या भागात बिबट्याचा कायम वावर असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या आंबा हंगाम सुरु असून तसेच पाळीव जनावरांना व शेतकऱ्यांना यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.याबाबत वनविभागाने त्वरित अंमलबजावणी करावी, अशी ग्रामस्थांतून मागणी करण्यात आली आहे.
