वेंगुर्ला /-

पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि याच श्रीमंतीची अनेक उदाहरणं आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलो आहोत. अलिकडेच आढळलेला काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघांचे अस्तित्व असेल त्यात भर म्हणून वेंगुर्ले तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील प्रार्णामित्र महेश राऊळ यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ज्याला मराठीमध्ये पोवळा साप असे म्हणतात ही सापाची जात अति दुर्मिळ जात मानली जाते.

महेश राऊळ हे गेली अनेक वर्ष भरवस्तीत आलेले साप पकडुन जंगलात सोडतात ते परिसरामध्ये सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. त्याशिवाय भटके प्राणी असतील किंवा वन्यप्राणी जखमी प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा महेश राऊळ नेहमी अग्रस्थानी असतात. असेच काम करत असताना त्यांना घराच्या शेजारी हा साप आढळून आला. त्यांनी तत्काळ आपले सहकारी वैभव अमृसकर आणि कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यू फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांना संपर्क केला. या तिघांनी शहानिशा केल्यानंतर त्यांना लक्षात आले की हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ असा आहे हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात किंवा हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जातं.

सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांनी सांगितले आहे. हेमंत ओगले यांनी या सापाचे संशोधन केले आहे. विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणार हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मन्यार सारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा हा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते. दगडा खाली आणि पालापाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक सरडे पाली गांडूळ इत्यादी आहे. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. तो करंगळी एवढा जाड असतो. ह्याच्या बरोबर डोक्यावरती भगवी जाड रेषा असते. जर हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका असा इशारा देत असतो.

हा साप महेश राऊळ यांना आढळल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांच्याशीही संपर्क केला व या सापा विषयी माहिती घेतली. महेश राऊळ, अनिल गावडे व वैभव अमृतकर यांनी या सापाचे नोंद त्यांच्या रजिस्टरमध्ये केली असून लवकरच या सापाच्या अधिवासाबद्दल व सापाच्या आढळाबाबत छोटेखानी शोधनिबंध लिहिणार असल्याचे सांगितले आहे. या सापाच्या आढळामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याची जैवविविधता जगाच्या समोर प्रकाशझोतात येणार असून येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधता दृष्ट्या जगाच्या नकाशावर झळकणार असल्याचे यावेळी फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page