कट्टा /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील बऱ्याच बाजारपेठा बंद करण्यात आल्या. याच अनुषंगाने मालवण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी नेहमी गजबजलेली असणारी कट्टा बाजारपेठ बुधवार दिनांक 23 सप्टेंबर ते बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत कट्टा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गाड यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी कट्टा व्यापारी संघाचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते. या बैठकीत कट्टा व्यापारी संघाने सामाजिक बांधिलकी जोपासत आपले होणारे आर्थिक नुकसान सोसत कोरोना विषाणूची वाढती साखळी तोडण्यासाठी आठ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीत कट्टा बाजारपेठेतील औषध दुकाने पूर्ण वेळ, दूध विक्री सकाळी 8 ते 9 या वेळेत होईल. बाकी इतर सर्व आस्थापने पुर्णपणे बंद ठेवली जातील असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती व्यापारी संघ कट्टा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, ग्रामपंचायत वरची गुरामवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ, पोलीस दुरक्षेत्र कट्टा यांना दिली आहे.