मसुरे पोलिसांकडून १५ गरजू कुटुंबांना मदतीचा हात!

मसुरे पोलिसांकडून १५ गरजू कुटुंबांना मदतीचा हात!

मसुरे /-

मसुरे पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या १४ गावांमध्ये शासनाच्या संचार बंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी येथील पोलीस कार्यरत आहेत. हे पोलीस कर्मचारी गोरगरिबांना सर्वतोपरी मदत सुद्धा करत आहेत. पोलिसात दडलेल्या माणुसकीचे दर्शन मसूरे पोलिसांनी आपल्या कृतीतून नुकतेच दाखवून दिले आहे. मसुरे येथील पोलीस हवालदार पी. बी. नाईक, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय यांनी मसूरे परिसरातील गरजवंत गरीब अशा निराधार १५ कुटुंबांना महिना भर पुरतील अशा जीवनावश्यक वस्तू देऊन एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. मसुरे पोलिसांच्या या समाजपयोगी उपक्रमा बद्दल कौतुक होत आहे.
पोलीस हवालदार पि. बी. नाईक, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय, दोन होमगार्ड कर्मचारी यांनी ग्रामस्थांनी संचारबंदीचे निर्देश कडक पणे पाळावेत यासाठी परिश्रम घेतले आहेत. आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या मसुरे येथील पोलीस बांधवांनी लोकांना घरातच राहावे यासाठी गस्त मोठ्या प्रमाणात वाढविली. सुरुवातीला आठवडा बाजार पूर्णपणे बंद करीत नागरिक गर्दी करणार नाहीत याची खबरदारी घेतली. एकत्र गस्त न घालता वेगवेगळ्या ठिकाणी हे पोलीस कर्मचारी एक एक एकटे फिरू लागल्याने रस्ते कायम सुनसान राहत आहेत. नाक्यानाक्यावर थांबणारे युवक सुद्धा भाऊंची गाडी येईल या भीतीने घरीच थांबण्यास पसंती देत आहेत.
आपले कर्तव्य कठोरपणे बजावतानाच लॉक डाऊन मुळे कुणाची उपासमार होऊ नये यासाठी मसूरे येथील पोलीस बांधव कार्यरत आहेत. मसूरे येथील सुमारे १५ गरीब गरजवंत कुटुंबांची लॉक डाऊन मुळे कठीण अवस्था झालेली होती. याची जाणीव होताच स्वखर्चाने या पंधरा कुटुंबांना एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूचे वितरुण पोलीस बांधवांनी केले आहे.
मसुरे पोलीस दूरक्षेत्र येथे पोलीस हवालदार पी. बी. नाईक, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर विश्वास साठे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, कांदळगाव पोलीस पाटील शीतल उदय परब, होमगार्ड ओमकार पडवळ, श्री सावंत,जितेंद्र परब, प्रदीप पाटकर अनिता मयेकर, विमल भांडे, कल्पना मोरे, बबन परब, आनंदी सावत, समिधा मोरे, सिंधु बाईत, रजनी ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर म्हणाले, मसुरे पोलिस हे कायद्याचे पालन करून गावागावात योग्य ती सेवा गेली कित्येक वर्षे चांगल्या पद्धतीने देत आहेत. आजही येथील १५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांनी पोलीस दलातही एक माणुसकी जपणारा माणूस लपलेला आहे याचे उदाहरण दिले. मसुरे पोलिसांचे हे कार्य समस्त पोलीस दलाची मान उंचावणारे आहे. पोलिसांच्या या अनोख्या कार्याची दाखल जिल्हा पोलिस प्रशासनाने ही घ्यावि असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यापूर्वीही अनेक वेळा मुसूरे पोलिसांनी निराधारांना पावसाळ्यात घराचे छप्पर बनवून दिले, तर एका गरीब कुटुंबाला घर बांधण्यास मदत केली, गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक मदत केली, तर अनेक गरजवंत रुग्णांना मोफत औषधोपचार याचा खर्चही मसुरे पोलिसांनी वेळोवेळी केलेला आहे. मसूरे येथील पी बी नाईक, हरिश्चंद्र जायभाय, विवेक फरांदे हे तीनही पोलीस कर्मचारी सर्वांना देवदूता प्रमाणेच भासत आहेत.

अभिप्राय द्या..