वेंगुर्ला /-
वेंगुर्ले पंचायत समितीचा ४१ लाख ३० हजार खर्चाचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा
वेंगुर्ले पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे वेंगुर्ले तालुक्याचा ४१ लाख ३० हजार रुपये खर्चाचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.जलजीवन मिशन योजने मधून नळपाणी योजना दुरुस्तीची कामे प्रस्तावित असल्याने यावर्षीचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा मर्यादित स्वरुपाचा करण्यात आला असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठाचे शाखा अभियंता प्रफुल्लकुमार शिंदे यांनी सांगितले.या संभाव्य पाणीटंचाई आराखडयात १३ लाख ५० हजार रुपये खर्चाची चार नळयोजना विशेष दुरुस्तीची कामे, ५ लाख रुपये खर्चाची तात्पुरती पूरक नळयोजना, १६ लाख रुपये एकुण खर्चाच्या १८ विंधन विहिरी, व ७ लाख ३० हजार रुपये खर्चाच्या ६ विहिरी खोल करण्याची कामे घेण्यात आली आहेत.नळ योजना विशेष दुरुस्तीखाली रेडी सौदागरवाडी नळ योजना विशेष दुरुस्ती ४ लाख, शिरोडा राऊतवाडी नळयोजना विशेष दुरुस्ती ३ लाख, परुळे बाजारवाडी नळ योजना विशेष दुरुस्ती ३ लाख ५० हजार, व भोगवे दुतोंड नळयोजना विशेष दुरुस्ती ३ लाख ही कामे घेण्यात आली आहेत.तात्पुरती पूरक नळयोजना खाली मोचेमाड वरचे अणसुर ५ लाख हे एक काम घेण्यात आले आहे. तर चिपी गाडेतडवाडी, चिपी भरणी, मातोंड गंडाचीराई, मातोंड नाटेली, वजराट परबवाडी, भोगवे दुतोंडवाडी, होडावडा पूनदळवीवाडी, आडेली दाभाडीवाडी,केळूस फळयेफोंडा,केळूस देऊळवाडी, पालकरवाडी – नमसवाडी, पेंडूर नेवाळेवाडी, वायंगणी नांदरुखवाडी, उभादांडा भेंडमळा, भोगवे शेळपी, वेतोरे देऊळवाडी, वेतोरे सबनिसवाडी, पालकरवाडी – कोंडसकरवाडी अशा एकूण १८ ठिकाणी एकूण १६ लाख रुपये खर्चाच्या विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत.आसोली हरिजनवाडी, वायंगणी डोमवाडी, आरवली सोनसुरेवाडी, परुळे, पेंडूर या ६ ठिकाणी एकुण ७ लाख ३० हजार रुपये खर्चाची ६ विहिरी खोल करण्याची कामे घेण्यात आली आहेत.