मसुरे /-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर युवा सेना उपजिल्हा प्रमुख व पोईप ग्रामपंचायत सदस्य पंकज वर्दम यांनी ग्रामस्थांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. पोईप ग्रामपंचायत हद्दीमधील आणि आसपासच्या परिसरातील सर्व रहिवाशांना ते आवाहन करतात की, मार्च 2020 पासून कोरोनाचा कहर चालू आहे. गेल्या वर्षभरात आपल्या परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. परंतु आता आपल्या दारात कोरोना येऊन पोहोचतोय ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे माझी सर्व स्थानिकांना आग्रहाची विनंती की, तांतडीच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर फिरु नका, अनावश्यक संपर्क टाळा, विशेषत: मुलांनी निदान १४ दिवस एकत्र येऊन खेळणे, गप्पा मारणे कृपया टाळा. आपण सर्वांनी या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी सहकार्य करा, आपल्या एका चुकीमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुणाचे प्राण जाऊ नयेत हीच अपेक्षा.आपल्याकडे जवळपास औषधोपचाराची चांगली सुविधाही उपलब्ध नाही याचा विचार करुन प्रत्येकाने एकमेकांच्या तब्येती सुरक्षित राखण्यासाठी प्रशासनाला मदत करा. माझ्याकडून आपल्या सर्वांना सर्वतोपरी सहकार्य असेल, कधीही, कोणत्याही वेळी व कोणत्याही प्रकारची मदत करण्यास मी मागे हटणार नाही याची मी ग्वाही देतो पण,या महत्वाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. हलगर्जीपणा करु नका, ही पुन्हा एकदा सर्व माता-पिता, बंधु-भगिनींना आणि मुलांना हात जोडून विनंती असल्याचे ते प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवितात.