वेंगुर्ला /-
जिल्ह्यातील मुख्याधिकारी यांनी प्रत्येक नगरसेवकाने सुचविलेली विकास कामे ही तांत्रिकदृष्ट्या अडचण त्या कामांस येत असेल तर ती अडचण दूर करून कसे करता येईल याचे मार्गदर्शन करून ते विकास काम होण्यास सहकार्य करावे. कारण, मुख्याधिकारी हे प्रशासनाचे अधिकारी व सर्व नियम कायद्याचे माहितगार असतात. नगरसेवकांचे ते मार्गदर्शक असतात. त्यामुळे वेळचेवेळी नगरसेवकांना त्यांनी नगरसेवकांच्या तक्रारी व विकास काम होत नसेल तर त्याची माहिती दिल्यास कुडाळ नगरपंचायतीत घडलेली कथित मारहाण प्रकरण होणार नाही आणि जर अशी मारहाण मुख्याधिकारी यांना केली असेल तर त्याचा आपण निषेध करतो.अशी प्रतिक्रिया वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संदेश निकम यांनी प्रसिद्धीस दिली आहे.कुडाळच्या नगरसेवकांकडून मुख्याधिकारी यांना मारहाण या कथित मारहाण प्रकरणी घडलेल्या वस्तुस्थितीची माहिती न घेता जर जिल्ह्यातील इतर नगरपरिषदा व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व प्रशासन एकजुट दाखवत निषेध करत असतील तर जिल्ह्यातील नगरसेवक लोकप्रतिनीधीही संघटीत होऊन एकत्र आले पाहिजे. कारण असा प्रकार हा नगरसेवकांच्या भागातील विकासकाम सातत्याने पाठपुरावा करुन केले जात नसेल तर होऊ शकतो. नगरसेवक हे निवडून आल्यानंतर त्यांना विकास कामाबाबत वा शहरातील अन्य कामाच्या बाबतीत नियम यांची माहिती नसते. ती माहिती मुख्याधिकारी यांनी द्यावयाची असते. पण ती दिली जात नसेल व विकास काम होत नसेल तर नागरीकांच्या रोषामुळे असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे असे प्रकार यानंतर घडू नये यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांना स्वतः किंवा त्या दर्जाचा जिल्ह्याचा अधिकारी प्रत्येक नगरपरिषदेतील नगरसेवकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ३ ते ४ महिन्यांनी आढावा बैठक घ्यावी. त्या बैठकीत नगरसेवकांनी मांडलेल्या अडचणी सोडविण्यासाठी बैठकीअंती मुख्याधिका-यांना सुचना कराव्यात. अशा व्यवस्थेमुळे कुडाळमध्ये घडलेला तथाकथित मारहाणीचा प्रकार घडणार नाही. अशी प्रतिक्रिया संदेश निकम यांनी व्यक्त केली आहे.मुख्याधिकारी यांना नगरसेवकाकडून मारहाण या कथित मारहाण प्रकरणांत जिल्ह्यातील कांही नगरपरीषदांच्या मुख्याधिकारी व प्रशासनाने जो कामबंद ठेवून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी हे नगरपरिषदेचे प्रमुख अधिकारी असल्याने आपण तसे न केल्यास आपणांवर ते कोणत्याही कारणास्तव कारवाई करू शकतात, या भितीने कर्मचारी त्यात सहभागी झालेले असतील. प्रत्येक नगरपालिका वा नगरपंचायतीत ८० टक्के कर्मचारी हे स्थानिक असतात. त्यांना विकास कामे कोणत्या तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकत नाहीत. याचेही ज्ञान असते. पण ती तांत्रिक कारणे कशाप्रकारे दूर करता येवू शकते. याचे सोल्युशन ते काढू शकतात व ते विकासकाम करुन घेऊ शकतात. पण हे अधिकार कर्मचा-यांना नसतात. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाच्या भागातले म्हणजे निवडून आलेल्या भागातले विकास काम हे त्याभागातील नागरिकांसाठी महत्वाचे असते. ते काम त्या भागातील नागरिकांनी अर्थात त्या भागातील नागरिकांनी सुचविलेले काम जर मुख्याधिकारी यांना सांगून वा त्याचा पाठपुरावा करून होत नाही व नागरिक नगरसेवकास त्याची विचारणा करतात. तेव्हा काम होत नाही म्हणून नगरसेवक चिडू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुख्याधिका-यांनी नगरसेवकांनी सुचविलेली कामे ही करावीत. जी कामे तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकत नसतील तर ती कशामुळे होऊ शकत नाहीत. त्यासाठी पर्याय कोणता याची माहिती त्या नगरसेवकांस द्यावी. अशी पध्दत जर मुख्याधिकारी यांनी राबविली तर नगरसेवकांकडून असे प्रकार होणार नाहीत.राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी करून जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा वा नगपंचायतींचा नगरसेवकांच्या तक्रारी व विकास कामाबाबतचा आढावा त्या त्या नगरपरिषदांत जाऊन जिल्हाधिकारी वा तत्सम सक्षम अधिकारी पाठवून घ्यावा. त्या आढाव्यानंतर त्या अधिका-यांने, मुख्याधिकारी यांना सुचना देऊन संबधित विकास काम वा समस्येचे निराकरण करून घ्यावे, अशी मागणी आपण करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संदेश निकम यांनी दिली.