मसुरे /-
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा दिवस वसुंधरेचं संरक्षण व्हावं आणि जनजागृती व्हावी ह्यासाठी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. हे निमित्त साधत श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून “अर्थ डे” ह्या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
आपण निसर्गाच्या सोबत राहिलो तर निसर्ग आपल्या सोबत राहील असं मत दिग्दर्शक डॉ. सुमित पाटील, निलेश गुरव आणि लेखक वेद दळवी यांनी या प्रसंगी व्यक्त केलं.
लहानपणापासून मुलांना निसर्गाची ओढ लागावी, निर्सार्गाचे महत्व कळावे आणि आपला निसर्ग हिरवागार कसा ठेवता येईल? ह्यावर ह्या लघुपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. त्याचबरोबर बालकलाकारांनी ह्यात टाकाऊ वस्तू वापरून पृथ्वीची टिकाऊ प्रतिमा तयार केली आहे.
हा लघुपट आज २२ एप्रिल रोजी ‘श्रीरंग ‘ या युट्युब चॅनल प्रदर्शित होणार आहे. या लघुपटात बालकलाकार सानिका कुंटे, रुची नेरुरकर, सोहम गुरव, हर्षल नाईक, जतीन गुरव, पार्थ गुरव, गणपत वेंगुर्लेकर आणि अभिनेता निलेश गुरव यांनी भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाचे लेखन वेद दळवी यांचे आहे. तर छायांकन मिलींद आडेलकर आणि संकेत जाधव यांचे आहे, कलादिग्दर्शन सुमित पाटील , रोहन नेरूरकर, संगीत यश यांचं आहे. लघुपटासाठी विवेक मिश्रा, चिन्मय परब, ओंकार परब,लवू परब, बर्डे सर आणि वसुंधरा विज्ञान केंद्र व देवमोगरमाता आदिवासी सेवाभावी संस्था नाशिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.