मालवण /-
संचारबंदी असूनही मालवण शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येईल असे काल मालवण तहसीलदारांनी स्पष्ट केल्यानंतर आज या मोहिमची कडक अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली. पोलीस ग्रामीण रुग्णालय कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांच्या पथकामार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत शहरातील मोक्याच्या नाक्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची धरपकड करून त्यांची ऑन दि स्पॉट कोरोना टेस्ट करण्यात येऊ लागल्याने विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर आज सोमवार निमित्त परगावातून आलेल्या भाजी विक्रेत्यांना मालवण बाजारपेठेत बसू न देता देऊळवाडा नाका येथे बसविण्याची कार्यवाही नगरपालिकेच्या पथकाने केली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कडक निर्बंधासह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीही अनेकजण विनाकारण फिरताना दिसून येत आहेत. मालवण शहरात अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहिल्याने यावर अंकुश ठेवण्यासाठी तहसीलदार अजय पाटणे यांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची ऑन दि स्पॉट कोरोना टेस्ट करण्यात येईल, यामध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट सह आवश्यक वाटल्यास आरटीपीसीआर टेस्टही करण्यात येईल असे काल स्पष्ट केले होते. याची नागरिकांनी धास्ती घेतली. आज या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मालवणच्या प्रमुख नाक्यांवर करण्यात आली. प्रारंभी शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या भरड नाका येथे ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे पथक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या जाणाऱ्यां पादचारी, सायकलस्वार, मोटारसायकल स्वार यांची धरपकड केली जात होती. यात विनाकारण फिरताना आढळणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात येत होती. त्यामुळे टेस्ट साठी नागरिकांची मोठी रांग लागली होती. ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांचे स्वॅब घेण्यात येत होते. विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचे येत असल्याचे मालवणात समजताच विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले. यामुळे शहरात फिरणाऱ्यांची संख्या हळू हळू कमी झाल्याचे दिसून आले. आज सोमवार असल्याने मालवणात परगावाहून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी सकाळीच हजेरी लावली. मात्र नगरपालिका कर्मचारी व पोलिसांनी भाजी विक्रेत्यांना मालवण बाजारपेठेत बसू न देता त्यांना देऊळवाडा नाका येथे बसविण्यात आले. यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यात आली.