वेंगुर्ला भटवाडी येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू..

वेंगुर्ला भटवाडी येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू..

वेंगुर्ला / –
वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी मध्यरात्री दाखल झालेल्या भटवाडी येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद मणचेकर यांनी दिली.वेंगुर्ले तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भटवाडी येथील सदर महिलेला गेल्या तीन-चार दिवसांपासून ताप येत होता. घरी राहूनच त्यांनी उपचार सुरु ठेवले होते. मात्र काल त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. सध्याची कोरोना महामारी लक्षात घेता मयत महिलेचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविला असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व तहसिलदार यांना माहिती दिल्यानंतर नगर परिषदेमार्फत शासनाचे नियम पाळून आज त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोडगे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाबरोबरच पोलिसांची मदत घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली. नगरपालिका कर्मचारी व रुग्णवाहिका चालक यांना ग्रामीण रुग्णालय तर्फे पीपीई कीट पुरविण्यात आले,असे डॉ. मणचेकर यांनी सांगितले.दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर सर्वानी काळजी घ्यावी व सर्व नियम पाळावेत, बाजारपेठेमध्ये अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन नगर पालिका मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..