कुंभवडे गावात नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडले..

वैभववाडी /-

तालुक्यातील कुंभवडे गावामध्ये नवजात अर्भक मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत सापडले.वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची फिर्याद पो.पाटील औदुंबर जिवाजी तळेकर यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.ही घटना शनिवारी मध्यरात्री 1:41 वाजता उघडकीस आली आहे.ग्रामपंचायत कुंभवडे ते कुंभवडे बौद्ध वाडी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत गवतामध्ये सुमारे 8 महिन्याचे पूर्ण वाढ झालेले स्त्री जातीचे नवजात अर्भक फेकून दिल्याने ते मृत होऊन कुजलेल्या स्थितीत आढळले आहे.या घटनेमुळे कुंभवडे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समजताच वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. मृत झालेले अर्भक हे स्त्री जातीचे असून दोन दिवसापूर्वीच अज्ञाताने पालन-पोषण न करण्याच्या हेतूने अपत्य जन्माची लपवणूक करून गुप्तपणे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने गवतात टाकून पळ काढला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांनी नवजात मृत अर्भक ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणले, वैद्यकीय अधिकारी नवनाथ कांबळे यांनी शवविच्छेदन करून त्या अर्भकाचे डीएनए घेतले आहेत.त्या नंतर मृत अर्भक पोलिसांच्या ताब्यात दिले,पोलिसांनी वाभवे – वैभववाडी नगरपंचायतिच्या हद्दीत दफन केले.
या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर,पोलीस हवालदार योगेश राऊळ,मारुती सोनटक्के,संदीप राठोड,महिला पोलीस कीशोरी घाडी करीत आहेत.

अभिप्राय द्या..