हरिद्वार कुंभमेळा १०२ साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह लाखोंशी संपर्क आल्याचा अंदाज..

हरिद्वार कुंभमेळा १०२ साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह लाखोंशी संपर्क आल्याचा अंदाज..

हरिद्वार /-

देशातील वाढती कोरोना रुग्ण संख्या धमकी भरवणारी आहे. अशा वातावरणात धार्मिक, राजकीय अशा कोणत्याही कार्यक्रमांना गर्दी करणे म्हणजे धोक्याची घंटी आहे. असं असतानाही जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी काल (११ एप्रिल) मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली होती. एकीकडे करोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे यावेळी लोकांकडून करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आलं आहे. मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन यावेळी करण्यात आलं नाही.

*गंगा नदीत स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी नदीकिनारी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी यावेळी हरिद्वारला येताना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं सरकारने अनिवार्य केलं असल्याने कोरोना हा येथे चिंतेचा विषय नसल्याचा दावा केला आहे.मात्र त्यानंतर एक चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. हरिद्वारमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.*

गंगेतील दुसऱ्या पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये लाखो साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११.३० ते सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८ हजार १६९ भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यात १०२ साधू आणि भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे संपूर्ण दिवसभरात त्यांचा फिरताना लाखो भाविकांशी संपर्क झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..