मुंबई /-
-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते. पण लोकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनची अंमलबजावणी मात्र दोन दिवसांनी होईल, अशी शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हसन मुश्रीफ यांनी यावेळी राज्यातील परप्रांतीय कामगारांना गावी न जाण्याचं आवाहन केलं आहे. “राज्यात लॉकडाऊन जरी जाहीर केला गेला तरी सरकार सर्व परप्रांतीय कामगारांची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये”, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिली. ते मु्ंबईत पत्रकारांशी बोलत होते.