कुडाळ /-

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कोणत्याही प्रकारचा आंबा हा कोकण हापूस या नावाने विक्री केला जातो. त्यामुळे सिंधुदुर्ग मधून येणाऱ्या आंब्याच्या विक्रीवर त्याचा परिणाम होत असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. याची दखल घेत श्री. भुसे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्या भागातून व या नावाने आंबा येईल त्याच नावाने विक्री करण्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी दिले आहेत.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या श्री भुसे यांचे याकडे लक्ष वेधताना श्री नाईक यांनी कोणत्याही प्रकारचा आंबा हा ‘कोकण हापूस’ म्हणून सगळीकडे विकला जात आहे त्यामुळे शेतक-यांची व ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला. कोकणातील आंबा उत्पादक शेतक-याच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत असून ग्राहकांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सहकार मंत्री यांचे सूचनेनुसार मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार फळ बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर आवक होत असलेला आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल, त्याच नावाने त्याची विक्री होईल, याबाबतची दक्षता घेण्यात यावी. अशाप्रकारे फसवणूक करून परराज्यातून आंबा हा शेतमाल त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास अगर याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन ( विकास व विनियमन ) अधिनियम, १ ९ ६३ नियम १ ९ ६७ व त्याखालील उपविधीतील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page