सावंतवाडी /-
सावंतवाडी येथील पंचायत समितीचे सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत हे आपला पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा देणार आहेत. येत्या दोन दिवसात आपण पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देऊ,असे त्यांचे म्हणणे आहे. आपण पक्षावर किंवा नेत्यावर नाराज नाही,परंतु गेले काही दिवस विकास कामांना आवश्यक असलेला निधी मिळाला नाही,तसेच वैयक्तिक घरगुती कारणामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली.
आपण गेली अनेक वर्षे कट्टर राणे समर्थक म्हणून काम केले. सामाजिक कार्यात आपण अग्रेसर आहोत. परंतु घरगुती कारणामुळे आपण हा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी अन्य कोणाला तरी संधी मिळावी,अशी आपली अपेक्षा आहे.तरी राजीनामा दिला असला तरी आपण मतदार संघात कार्यरत राहणार आहे.पक्षासाठी व पक्ष नेतृत्वासाठी सुद्धा भविष्यात आपण काम करण्याची तयारी आहे.श्री. सावंत हे गेली चार वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत.आता होणा-या पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी ते प्रबळ दावेदार होते. त्यामुळे त्यांनी अचानक अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय गोटात चर्चा होणार आहे.