कुडाळ /-
शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेला नाव देण्यात आलेले ‘ ते ‘ वादग्रस्त डॉक्टर एका माजी केंद्रीय मंत्र्याच्या स्वयंसेवी संस्थेवरही विश्वस्त असल्याचे आता समोर आले असून शहरात हा आता चर्चेचा विषय बनला आहे. शहरवासी याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत आहेत.ही संस्था गेली अनेक वर्षे जिल्ह्यात विशेषतः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध क्षेत्रात काम करीत असून सदर संस्था जिल्ह्यात एक नर्सिंग कॉलेज सुद्धा चालवत आहे.
अमेरिकेत कायम वास्तव्य असलेले हे डॉक्टर गेली अनेक वर्षे जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात काम करीत आहेत.’वसुंधरा’ या विज्ञानविषयक संस्थेवरही ते कालपर्यंत काम करीत होते.अलिकडे त्यांनी जिल्ह्यात आरोग्य तपासणी शिबीरे भरविली होती तसेच ग्रामीण भागात तंबाकू विरोधी मोहीम चालवून युवक वर्गात जागृती करण्याचे काम केले होते.मात्र परवा याच डॉक्टरबाबत एक आक्षेपार्ह पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर शहरात,जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
शहरातील संतप्त नागरिकांनी सदर शाळेत जाऊन संस्था चालकांना यासंदर्भात धारेवर धरले आणि ‘ त्या ‘ वादग्रस्त डॉक्टर वर कारवाई करण्याची मागणी केली तसेच शाळा इमारतीवर त्यांच्या नावाचे असलेले बोर्ड काढून टाकण्याची मागणी केली अखेर व्यवस्थापनाला ही मागणी मान्य करणे भाग पडले.आज दुपारी सदर वादग्रस्त डॉक्टरचे नाव असलेले शाळेच्या इमारतीवरील बोर्ड काढून टाकण्यात आले.दरम्यान वादग्रस्त ठरलेले हेच डॉक्टर एका माजी केंद्रीय मंत्र्याच्या स्वयंसेवी संस्थेवर विश्वस्त असून या संस्थेच्या माध्यमातून ते गेली दोन वर्षे जिल्ह्यात ‘मानव सेवा’ करीत आहेत अशी माहिती आता पुढे आली असून काल शहरात याबद्दल उलट – सुलट चर्चा सुरू होती.काहींनी तर ही माहिती समजताच आश्चर्यसुद्धा व्यक्त केले आहे.
या डॉक्टरबाबत व्हायरल झालेलं ते निनावी पत्र आणि काल दिवसभरात कुडाळ इंग्रजी माध्यम शाळेत घडलेल्या घटनांची इत्यंभूत माहिती सदर माजी केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या संस्थेच्या अन्य विश्वस्तानी मागवून घेतली असून हे सर्वजण हादरून गेले असल्याचे समजते.अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या जिल्ह्यातील काही मंडळींनी शहरातील आपल्या नातेवाईक व मित्रांशी फोनवर संपर्क साधून सर्व घटनांची माहिती घेतल्याचे समजते.