मुंबई ही महाराष्ट्राच्या बापाची :खा.संजय राऊत

मुंबई ही महाराष्ट्राच्या बापाची :खा.संजय राऊत

मुंबई /

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या नटीच्या पाठीशी भाजप राहतो हे दुर्दैवी आहे, असे रोखठोक मत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. रविवारच्या सामनातील रोखठोक या सदरातून त्यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना राणावतचा आपल्या आक्रमक शैलीत समाचार घेतला आहे.राऊत म्हणता की, मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांच्यामागे भाजप उभा राहतो हे दुर्दैवी आहे. मुंबई विरोधात ६०-६५ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी पद्धतशीर कारस्थाने केली. त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय ठेवून मराठी माणसाने भगवा झेंडा फडकवला. भाजपाचे प्रमुख नेते आशिष शेलार म्हणतात ‘ज्या काँग्रेसने मराठी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे.’

भाजपा नेत्यांचा इतिहास कच्चा आहे. ज्यावेळी गोळ्या झाडल्या गेल्या त्यावेळी मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. मराठी बांधवांसोबत काही गुजराती लोकांनाही गोळ्या घालण्यात आल्या. काही वर्षांनी तेच मोरारजी देसाई काँग्रेसला रामराम ठोकून पंतप्रधान झाले. त्या मंत्रिमंडळात लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांनी मंत्रिपदे भुषवली होती, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईला पीओके म्हटले गेले. मुंबईचा अपमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली, तेव्हा महापालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला.
एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध एकेरी भाषा बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राम मंदिरच होते असा कांगावाही तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करुन ती सांगत असलेल्या पाकिस्तानात बांधले. मुंबईला ‘पाकिस्तान’ म्हणायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिक स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ?
संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरुन अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. मुंबई महाराष्ट्राच्या बापाची आहे.

अभिप्राय द्या..