समील जळवी –

२० जुलै २०२०…! साधारण रात्रीचे दहा-साडे दहा वाजले असतील. *”आमदार वैभव नाईक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह…”* ही ब्रेकिंग न्युज सोशल मिडियावर सगळीकडे धडकली. एका क्षणापुरती का होईना काळजात धस्स झाले…! त्या क्षणार्धात अनेक गोष्टी डोळ्यासमोर तरळायला लागल्या. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरकाव केला होता. सिंधुदुर्गात बरोब्बर एक वर्षापुर्वी २६ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण कणकवली तालुक्यात सापडला. त्याच दिवशी नेमका आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस असल्याने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर मित्रत्वाच्या नात्याने सल्ला देताना म्हणालो होतो की, “वुहानच्या प्रयोगशाळेत तयार झालेला हा कोरोना विषाणु संपुर्ण जगभरात भ्रमंती करून आता आपल्या कणकवलीच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचलाय. त्याला तुमच्या घराच्या वेशीपर्यंत बिल्कुल येऊ देऊ नका. आता यापुढे तुम्ही मतदारसंघातील फिरती पुर्णपणे बंद करा आणि घरी सुरक्षित राहून आपली व कुटुंबियांची काळजी घ्या.” सुरुवातीचे काही दिवस त्यांनी माझा सल्ला मनावर घेऊन घरी थांबणेच पसंत केले. मात्र मतदारसंघाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आठवडाभरानंतर पुन्हा त्यांची भेट झाली तेव्हा ते मला म्हणाले की, *”मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणीला कायम धावून जाणारा आमदार अशी माझी सर्वत्र ख्याती आहे. ‘सदैव तुमच्यासोबत’ हे ब्रीदवाक्य घेऊन मी राजकीय जीवनात काम करतोय. त्यासाठीच कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने मला दोन वेळा आमदार म्हणुन निवडून दिले आहे. आज कोरोनाच्या या भीषण संकटात जीवाची पर्वा करून मीच घरात बसून राहिलो तर माझ्यावर विश्वास ठेवलेल्या त्या लाखो लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही का…? लोकप्रतिनिधी म्हणुन जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे जनतेत मिसळून त्यांची सेवा करत असताना मला कोरोना कधीतरी गाठणारच आहे. तशी मनाची तयारी करूनच हे जनसेवेचे जे व्रत आहे ते मी अंगीकारले आहे. त्यातून आता कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही.”* त्यांच्या या उत्तरानंतर मी सुद्धा निरुत्तर झालो. त्यानंतर त्यांना कधी मी त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखले नाही.

कोरोना काळात त्यांनी मतदारसंघातील जवळपास सर्वच गावात भेटी देत जनतेची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. या गावभेटीदरम्यान त्यांना संपुर्ण मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेता आला. मे महिन्यात लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबईतील चाकरमानी जिल्ह्यातील गावागावात दाखल झाले. त्यांना गावातील शाळेत किंवा मंदिरात विलगीकरण करून ठेवणे हे जिल्हा प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान होते. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देऊन विलगीकरण व्यवस्थेसंदर्भात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी समजून घेतल्या. ते तेवढ्यावरच थांबले नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून कोव्हिड उपाययोजनेसंदर्भात जिल्ह्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची मागणी केली. त्यांनी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्या सर्व गोष्टींची पुर्तता देखील केली. *आमदार वैभव नाईक मुख्यमंत्र्यांकडे कोव्हिड काळात आवश्यक गोष्टींची व्यवस्थितरीत्या मागणी करू शकले कारण त्यांचा ग्राऊंड लेव्हलला असलेला जनसंपर्क दांडगा होता. मतदारसंघातील जनतेला कोव्हिड काळात नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याची त्यांना पुर्ण कल्पना होती.* त्यामुळेच आमदार वैभव नाईकांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एका हिंदी कवितेतील ओळींची मला आठवण झाली.

*”मौत का क्या भय तुम्हें,*
*जीत की हैं लय तुम्हे…*
*वीरता का पाठ तु,*
*युद्ध का पुराण तु…”*

*खरं तर संघर्ष आणि वैभव हे शब्द व्यावहारिक जगात कधीच एकत्र येत नसतात. जिथे संघर्ष असतो तिथे वैभव नसते आणि जिकडे वैभव असते त्यांना कधी संघर्ष पाहावाच लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता संघर्ष व वैभव हे दोन्ही शब्द समानार्थी वाटावेत की काय एवढा प्रचंड संघर्ष आजपर्यंत एकट्या वैभव नाईकांच्या वाटेला आला.* २००९ विधानसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री मालवणात त्यांच्या एकट्याच्या गाडीचा पाच ते सहा गुंड भरलेल्या गाड्यांनी केलेला थरारक पाठलाग असो… त्याच्याच दुसऱ्या दिवशी मतदान संपायला अवघे काही तास शिल्लक असताना माणगावात एका माथेफिरूने भर रस्त्यात त्यांच्यावर रोखलेली रिवॉल्व्हर असो… किंवा २०१३ साली कणकवलीमध्ये पोलीसांसोबत झालेला आमने-सामने प्रकरणातील राडा…! वैभव नाईक हे नाव उच्चारताच या आणि अशा अनेक घटना सिंधुदुर्गातील जनतेच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. *संघर्ष हा वैभव नाईकांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. किंबहुना आमच्यासाठी संघर्षाचे दुसरे नावच वैभव नाईक आहे…!* रणजीत देसाई यांच्या गाजलेल्या ‘राधेय’ कादंबरीच्या मलपृष्ठावर लिहिलेल्या त्या ओळी आमदार वैभव नाईक यांना तंतोतंत लागु पडतात-

*”मी योद्धा आहे…*
*जखमांची भीती बाळगुन भागायचं नाही…*
*जन्माबरोबर सुरु झालेल हे युद्ध, अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवल पाहिजे…*
*त्यातच माझ्या जीवनाच यश सामावल आहे…!!!”*

संघर्षाची भली मोठी पार्श्वभुमी असलेल्या वैभव नाईकांनी कोरोना विषाणूसोबत देखील त्याच आवेशात संघर्ष केला. आमदार असल्यामुळे ते मुंबई, पुणे येथील अद्यदावत हॉस्पिटलमध्ये आरामात उपचार घेऊ शकले असते. मात्र त्यांनी कोरोनावर उपचार घेण्यासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयाची निवड केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी कोरोना विषाणूविरोधातल्या लढाईत ओरोस जिल्हा रुग्णालयाचा एकमेव आधार उरला होता. *आपल्यावर प्रेम करणारी जिल्ह्यातील जनता कोरोना विरोधातील लढाईत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना नेमक्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याची लोकप्रतिनिधी म्हणून माहिती करून घेणे वैभव नाईकांना आवश्यक वाटले. त्यासाठीच त्यांनी पदाचा कसलाही बडेजाव न बाळगता जिल्हा रुग्णालयातच उपचार घेणे पसंत केले. दस्तरखुद्द आमदारांनीच कोरोनावरील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय निवडल्यामुळे त्याठिकाणी दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि सर्वसामान्य जनतेचा जिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या सोयी सुविधांवरील विश्वास आणखीनच वृद्धिंगत झाला.* कोरोनाच्या विळख्यातून सुटल्यानंतर शासनाच्या नियमानुसार काही दिवस विलगीकरणात राहून त्यांनी पुन्हा आपली मतदारसंघातील घोडदौड सुरुच ठेवली. आज कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून कोव्हिड काळात झालेल्या विविध कामांचा लेखाजोखा मी आपल्यासमोर मांडत आहे.

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-:*
गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी होत होती. किंबहुना जिल्ह्याच्या मरणाप्राय अवस्थेत असलेल्या आरोग्यव्यवस्थेला नवसंजीवनी मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही काळाचीच गरज बनली होती. आमदार वैभव नाईक यांच्यासोबत पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. एवढेच नव्हे तर ९६६ कोटी रुपये खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता सुद्धा देऊन टाकली. त्याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा अवघड मार्ग पुर्णतः मोकळा झाला आहे.

*आरटीपीसीआर कोव्हिड १९ लॅब निर्मिती-:*
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कोव्हिड चाचणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॅब नसल्याने अन्य ठिकणावरून कोव्हिड चाचण्या करून घ्याव्या लागत होत्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी आमदार वैभव नाईकांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या आग्रही मागणीमुळे तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरटीपीसीआर कोव्हिड १९ लॅबची निर्मिती करण्यात आली. त्याचबरोबर ट्रुनॅट मशिनव्दारे कोव्हिड -१९ ची तपासणी सुद्धा करण्यात आली.

*जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट-:*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत पालकमंत्री उदय सामंत, खासदर विनायक राऊत यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात राज्य शासनाच्या माध्यमातून ७२ लाख रुपये खर्च करून अद्ययावत अशा ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली. मोठ्या ५८ बाटली भरण्याची या प्लांटची क्षमता आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन कोव्हिड रुग्णांना याचा फार मोठा लाभ झाला.

*कोव्हिड उपाययोजनांकरीता अत्याधुनिक उपकरणे-:*
कोव्हिड उपाययोजनांकरीता कुडाळ ग्रामीण रुग्णालयासाठी ईसीजी मशीन, मल्टीपॅरामाॅनिटर, इन्फ्युजन पंप तसेच सीएसआर फंडातून एक्स-रे मशीन अशी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर ओरोस क्रीडा संकुलात कोव्हिड सेंटर, अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या, कोरोना रुग्णांना उपयुक्त ठरणाऱ्या रेमिडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून घेतला. कुडाळ व मालवणमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर करण्यासाठी पाठपुरावा केला. नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवणसाठी रुग्णवाहिका पुरविण्यात आली. कुडाळ मालवण मतदारसंघातील ४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत कोव्हिड लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

*कोव्हिड निवारणासाठी आमदार निधी-:*
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सर्वप्रथम जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतुन २५ लाख रुपयांचा निधी दिला. त्यामधून ग्रामीण रुग्णालय मालवण, ग्रामीण रुग्णालय कुडाळ व पेंडूर कट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयसोलेशन वॉर्डसाठी आवश्यक असणारे साहित्य व उपकरणे पुरविण्यात आली. त्याचबरोबर हाफकीन इन्स्टिट्यूटच्या मान्यतेने ५०० पीपीई किट खरेदी करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात पीपीई किटसाठी आपला आमदार निधी मंजूर करून घेणारे वैभव नाईक हे पहिलेच आमदार ठरले. कुडाळ मालवण मधील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांना शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर थर्मल गन, ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. त्याकरिता १० लाख रुपयांचा निधी त्यांनी आमदार फंडातुन उपलब्ध करून दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रांना एन-९५ मास्क व सर्वसामान्य जनतेला आमदार निधीतून मास्कचे वाटप करण्यात आले.

*आरोग्यवर्धिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यात बीएएमएस डॉक्टर उपलब्ध-:*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य विभागात गेली कित्येक वर्षे डॉक्टरांची पदे रिक्त होती. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत होता. आरोग्यवर्धिनी योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करून या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल एक्याण्णव बीएएमएस डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे कोव्हीड काळात आरोग्य यंत्रणा सक्षम होऊन जिल्हाभरातील रुग्णांना याचा लाभ झाला.

*ओरोस जिल्हा रुग्णालयात कँटीन व शिवभोजन योजना सुरु-:*
लॉकडाऊनमुळे दुकाने व हॉटेल्स बंद असल्यामुळे ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांची जेवणाची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा रुग्णालय परिसरात कँटीन सुरू करून घेतले. त्याचबरोबर या कँटीनमध्ये महाराष्ट्र शासनाची शिवभोजन योजना देखील सुरू करण्यात आली. त्यामुळे लोकांची जेवणासाठी होणारी गैरसोय दूर झाली. त्याचबरोबर मालवण व कुडाळ तालुक्यातही शिवभोजन योजना केंद्र सुरु करून गरीब व गरजू नागरिकांना ५ रुपयांमध्ये भरपेट जेवण उपलब्ध करून देण्यात आले.

*विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या इमारतीत कोव्हिड विलगीकरण कक्ष-:*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत होता. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवले जात होते. परिणामी मोठ्या प्रमाणात विलगीकरण कक्षांची आवश्यकता भासत होती. त्यामुळे रुग्णांची व आरोग्य यंत्रणेची गैरसोय होऊ नये याकरीता आमदार वैभव नाईक यांनी आपल्या शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजची इमारत व कँटीन विलगीकरण कक्षासाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेक नागरिकांना त्याठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था उपलब्ध झाली.

*लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्यांना मदतकार्य-:*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोकरी व शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जण मुंबई, पुणे ,गोवा, कोल्हापूर व इतर जिल्ह्यात अडकून पडले होते. त्यांची राहण्याची व जेवणाची गैरसोय होत होती. ही बाब आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लागलीच शिवसेना कार्यकर्ते व दशभुज मंडळाच्या माध्यमातून विविध ठिकाणी अडकलेल्या सिंधुदुर्गवासियांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यावर भर दिला. जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेनची व बसेसची व्यवस्था करण्यात आली.

*आंबा वाहतुकीसाठी उपाययोजना-:*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा बंद असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आंबा उत्पादनाचे नुकसान होऊ नये म्हणून आंबा वाहतूकदारांना आंबा वाहतुकीचे पास देण्यात आले. मुंबई, पुणे व इतर भागात आंब्याच्या वाहतूकीसाठी मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. ट्रेन व बसेस मधून आंब्याची वाहतूक करण्यात आली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याची मोठ्या प्रमाणात उचल होऊन बागायतदारांची चिंता दूर झाली.

*प्रवाशी पाससाठी माहिती केंद्रे-:*
लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्हयात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक होते. त्यासाठी शासनाने दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे होते. त्याबाबतची माहिती संबंधित व्यक्तींना सुलभरीत्या मिळावी यासाठी आमदार वैभव नाईक यांनी कणकवली, कुडाळ व मालवण तालुक्यात तीन माहिती केंद्रे सुरु केली. त्यांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना मोफत पास उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी पोहोचणे सोयीचे झाले.

*लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांना मदत-:*
रिक्षा व्यावसायिक, सलून व्यावसायिक, दशावतारी कलाकार यांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद पडल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. आमदार वैभव नाईकांनी हातावर पोट असणाऱ्या या सर्वाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच भजन, कीर्तन, दशावतार या लोककला सादरीकरणासाठी असलेले निर्बध उठवण्यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला.

*जप्त केलेली वाहने मालकांना परत मिळण्यासाठी प्रयत्न-:*
लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर विनापरवाना फिरणारी वाहने पोलिसांनी जप्त करून वाहन मालकांवर गुन्हे दाखल केले होते. वैभव नाईक यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करून जप्त केलेली वाहने मालकांच्या ताब्यात परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार वाहन मालकांना गाड्या ताब्यात देण्याची पोलिसांकडून कार्यवाही करण्यात आली.

*मच्छीमारांसाठी ६५ कोटींचे पॅकेज-:*
एकीकडे कोरोनाचे संकट आणि त्याच दरम्यान दोन भयानक वादळे कोकण किनारपट्टीवर धडकल्यामुळे मच्छीमारांचा व्यवसाय पुर्णपणे ठप्प झाला. वादळामुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचे, होड्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वैभव नाईकांनी शासनदरबारी पाठपुरवठा केला. मच्छीमारांच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन ६५ कोटींचे पॅकेज मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. या पॅकेजमध्ये काही जाचक अटी होत्या. त्या शिथिल करण्यासाठी त्यांना पुन्हा पाठपुरावा करावा लागला. त्यामुळे आता या पॅकेजचा लाभ प्रत्येक क्रियाशील मच्छिमाराला होणार आहे. आमदारांनी किल्ला प्रवासी बोटसेवा पाठपुरावा करून सुरु करून घेतली. मच्छीमारांचा शासनाकडे प्रलंबित असलेला डिझेल परतावा त्यांनी मिळवून दिला.

*घोटगे सोनवडे घाटमार्ग-:*
अनेक वर्षे प्रलंबित असलेला सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घोटगे सोनवडे घाटमार्ग पूर्ण करण्याच्या दृष्टीने व त्यासाठी आवश्यक असलेली पर्यावरण व वन विभागाची परवानगी मिळविण्यासाठी वैभव नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांच्या समवेत महत्वपूर्ण भुमिका बजावली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून या घाटमार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली. घाटमार्गाच्या अलायमेंटमध्ये काही प्रमाणात बदल करण्याची आवश्यकता असल्याने तो भाग वगळता उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

*मालवणमध्ये फिश एक्वेरियम-:*
वैभव नाईकांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कुडाळ व मालवण शहरासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये मालवणसाठी ५ कोटी तर कुडाळसाठी ४ कोटी रुपये नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून आमदारांच्या संकल्पनेतील फिश एक्वेरियम मालवणमध्ये साकारले जाणार आहे.

*उच्चांकी भात खरेदी-:*
शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेल्या भाताची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी एकूण ३५ भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली. या सर्व भात खरेदी केंद्रांमधून आतापर्यत एकूण ५० ते ५५ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. वैभव नाईक यांनी भात खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे एकूण ४ हजारहुन अधिक शेतकऱ्यांनी भात विक्री केली. त्यांना क्विंटलमागे एकूण २५६८ रुपये दर मिळवून देण्यात आला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वेळेत खतपुरवठा, कृषी यांत्रिकीकरण योजनेतुन शेती अवजारे, चांदा ते बांदा योजनेतून शेतकरी गटांना कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.

*दिव्यांग बांधवांना चारचाकी-:*
वैभव नाईक यांच्या माध्यमातून गतवर्षी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना चारचाकी स्कुटरचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. हा उपक्रम राबवून दिव्यांग बांधवांना एक नवी भरारी घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावर्षी देखील अशाच प्रकारचा उपक्रम राबविला जाणार आहे.

*अर्थसंकल्पात भरघोस निधी-:*
कोरोना काळात सर्वकाही ठप्प झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकुल परिणाम होऊन निधीच्या कमतरतेमुळे राज्यातील विकासकामे थांबविण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मालवण मतदारसंघासाठी विविध योजनांमधून भरघोस निधी मंजूर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पात कुडाळ व मालवण या दोन्ही तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गांचे मजबुतीकरण करणे त्याचप्रमाणे पूल बांधणे, धुपप्रतिबंधक बंधारे बांधणे, संरक्षक बंधारा बांधणे ही नवीन कामे मंजूर झाली आहेत. या कामांसाठी अर्थसंकल्पात ३२ कोटी ७८ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर चालू वर्षातील मंजूर परंतु अपूर्णावस्थेत असलेल्या कामांना देखील वाढीव व उर्वरीत निधीची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवून अनेक रस्त्यांचे नुकसान झाले होते. विशेष पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३५ कोटी ७९ लाख ६४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर रस्ते व पुल परीरक्षण व दुरूस्ती कार्यक्रम अंतर्गत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाकरीता २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

थोड्याशा लांबलेल्या या विवेचनाचा शेवट करताना मला कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील त्या गाजलेल्या ओळी आठवतात –
*”पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती,*
*होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती…*
*कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे,*
*बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे…”*
कवी कुसुमाग्रजांच्या या ओळींप्रमाणे आमदार वैभव नाईक आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण अक्षरशः कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी जगले. गेली कित्येक वर्षे विकासाच्या प्रक्रियेपासुन वंचित राहिलेल्या या मतदारसंघात त्यांनी विकासाचा नवा लँडमार्क प्रस्थापित केला. आमदार वैभव नाईक यांच्या कारकिर्दीचा एकंदरीतच विचार केला असता साक्षात संघर्षालाही लाजवेल अशी त्यांची किमया आणि वादळी व्यक्तिमत्व आहे. आज त्यांच्या वाढदिवशी मी त्यांना खुप खुप शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page