वेंगुर्ला / –
महाराष्ट्र प्रदेश भाजपा च्या वतीने संपूर्ण राज्यात २० मार्च ते २५ मार्च या कालावधीत ” समर्थ बुथ – सशक्त शक्ती केंद्र ” या अभियान अंतर्गत चौक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष राजन तेली व बुथ अभियान संयोजक महेश सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १४ मंडलातील २०९ शक्ती केंद्रावर हे अभियान राबविण्यात येणार आहे.
प्रत्येक चौकसभेत सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला जाणार आहे.यावेळी प्रत्येक शक्ती केंद्रामधील बुथप्रमुख व बुथ समिती तसेच मतदारांना एकत्रित करून महाविकास आघाडी सरकारच्या अन्याय, अत्याचारी व निष्क्रियतेच्या विरोधात प्रत्येक शहरात, गावात व चौकात चौकसभा घेऊन शासनाच्या विरोधात जनजागृती करण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्राला सर्व बाजूंनी संकटात ढकलणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध करुन कोणताही समन्वय नसलेल्या आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या बेबंद कारभारामुळे महाराष्ट्र राज्य सर्व बाजूंनी संकटात सापडले आहे.राज्यात असुरक्षिततेचे व निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याला संकटात टाकणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा अशा चौकसभेत निषेधाचा ठराव घेतला जाणार आहे.महाविकास आघाडीने कोरोनाचा सामना करताना कमालीचा ढिसाळपणा दाखवल्यामुळे राज्यावर कोरोनाचे संकट नव्याने ओढवले आहे.राज्यात महिलांवरील अत्याचाराची समस्या गंभीर झाली आहे.महिलांवरील विशेषतः अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत.तसेच सरकारने शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रु. ची मदत देऊ हे बांधावर जाऊन दिलेले आश्वासन मुख्यमंत्री सोयीस्कर पणे विसरले. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडुन मिळालेली स्थगिती असो किंवा ओबीसींच्या मनात मंत्र्यांनीच निर्माण केलेली अस्वस्थता असो. तसेच लाॅकडाऊन नंतर राज्यातील जनतेला मिळालेली भरमसाठ वीजबिले असो.परंतु “सर्वसामान्य” व अन्य घटक “आर्थिकदृष्ट्या” संकटात असूनही वीजबिलाच्या बाबतीत सरकारने काहीच दिलासा दिलेला नाही, उलट शेतकऱ्यांसह लाखो सर्वसामान्य नागरिकांना वीज जोडणी तोडण्याच्या नोटिसा पाठविल्या.अशा प्रकारे महाविकास आघाडी सरकारचा बेफिकीर कारभार जनतेसमोर उघड करण्यात येणार आहे.
कोव्हीड १९ (कोरोना) महासाथीच्या संकटावर मात करण्यासाठी भारताचे क्रियाशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेच्या साथीने अत्यंत धैर्यानं देशाचे प्रभावी नेतृत्व केले.तसेच या संकटातून देशाला बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केले.या ऐतिहासिक कामगिरीबद्दल चौकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम करून दोन भारत निर्मित लसी उपलब्ध करण्यात यश मिळविले. कोरोनाच्या महामारीतुन बाहेर पडणाऱ्या भारतासमोर आत्मनिर्भर भारत उभारण्याचे उद्दिष्ट सादर करुन पंतप्रधानांनी देशाच्या स्वावलंबनाच्या बाबतीत नवे ध्येय ठेवले व २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले.आत्मनिर्भर पॅकेजने देशाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श केला आणि त्यामध्ये अर्थकारण,पायाभूत सुविधा,व्यवस्था,लोकसंख्या आणि मागणी अशा सर्व बाबींसाठी तरतुदी करण्यात आल्या.अशा सर्व विषयांचा उहापोह या चौकसभेमध्ये करण्यात येणार आहे,अशी माहिती भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page