वेंगुर्ला /-
युवा व क्रीडा मंत्रालय चे नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग,भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला लौकिक सभागृह येथे राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत जलसवांद, प्रश्नमंजुषा आणि स्लोगन लेखन स्पर्धा संपन्न झाली.
प्रश्नमंजुषा स्पर्ध्येमध्ये अमृत गावडे यांनी प्रथम, स्वप्निल मांजरेकर यांनी द्वितीय तर शुभम गावडे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. या जलजागृती कार्यक्रमांमध्ये ‘स्लोगन’ लेखन स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये चैताली पवार यांनी प्रथम, तृप्ती साधले यांनी द्वितीय तर अंकिता कांबळी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त करीत यश संपादन केले. यावेळी आयोजित केलेल्या जलसंवाद कार्यक्रमांमध्ये दृकश्राव्य माध्यमांचा वापर करीत वेंगुर्ले पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनच्या गटसमन्वयक द्रौपदी नाईक यांनी सदर मोहिमेचे महत्व, पाण्याचे महत्व आणि बचतीचे उपाय याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर पंचायत समितीच्या समूह समन्वयक अश्विनी किनळेकर यांनी पावसाचे पाणी साठवण्याचे महत्व, कूपनलिका-तळी-विहिरी यांच्या स्वच्छतेचे महत्त्व तसेच त्यात वापरणाऱ्या औषधांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रमाण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तर कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम चे उपाध्यक्ष महेश राऊळ यांनी जागतिक दृष्टीकोनातून पाणी प्रश्न आणि मानवाची भूमिका स्पष्ट करत वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाणवठे तयार करा, असे आवाहन केले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही.आर. तिरोडकर यांनी दुष्काळ, पाण्याचे राष्ट्रीयकरण, पिण्याचे पाणी व इतर कारणांसाठी वापरावायाचे पाणी यातील भेद याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर,किरण राऊळ,सदाशिव सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यता मसुरकर हिने केले.