व्यापाऱ्यांना कर्ज प्रकिया सुलभ होण्यासाठी शासनाने सर्व प्रयत्न सुरू.;आम.वैभव नाईक

व्यापाऱ्यांना कर्ज प्रकिया सुलभ होण्यासाठी शासनाने सर्व प्रयत्न सुरू.;आम.वैभव नाईक

कुडाळ /-

व्यापारी बांधवांनी व्यवसायातील बदल स्विकारून नवनवीन संकल्पना अंमलात आणल्या पाहीजेत. व्यवसायासाठी शासनाच्या योजनांचा व्यापारीवर्गाने लाभ घेऊन व्यापारात नवीन क्रांती करावी. व्यापा-यांसाठी असलेली कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे केले.
कुडाळ तालुक्यातील व्यापारी वर्गासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या संकल्पनेतून आणि तालुका व्यापारी संघटनेच्या माध्यमातून शनिवारी कुडाळ येथील अनंत मुक्ताई हाॅलच्या सभागृहात व्यापारीवर्गासाठी असणा-या शासनाच्या विनाव्याज कर्ज योजना व अन्य विविध योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिराचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी हाॅटेल संघटना जिल्हाध्यक्ष राजन नाईक, व्यापारी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष संजय भोगटे, प्रमुख मार्गदर्शक अजित दळवी, कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत, सचिव भूषण मठकर, खजिनदार नितीश म्हाडेश्वर, ज्येष्ठ व्यापारी पी.डी.शिरसाट, अवधूत शिरसाट, प्रसाद शिरसाट आदींसह शहर व ग्रामीण भागातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.नाईक म्हणाले, कुडाळ तालुका व्यापारी संघटना चांगल्या प्रकारे काम करीत आहे. व्यापारीवर्गाच्या हितासाठी नुतन तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट व सहका-यांनी आयोजित केलेला हा मार्गदर्शन कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यातून तालुक्यातील व्यापारीवर्गाला व्यवसायासाठी फायदा होणार आहे. मी सुद्धा एक छोटा व्यापारी आहे. नवनवीन बदल होत आहेत. प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. त्यामुळे व्यापारीवर्गानेही पुढील काळात हे बदल प्रत्येकाने स्विकारले पाहीजेत. होऊ. हे प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितच सोडविले जातील अशी ग्वाही आ.नाईक यांनी यावेळी दिली.
माजी तालुकाध्यक्ष संजय भोगटे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात सर्वच उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला. शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या माध्यमातून कोरोना कालावधीत संकटात सापडलेल्या उद्योग व्यवसायांना पुन्हा उभारी देण्याच्या दृष्टीने कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट व सहकारी अशाप्रकारचा उपक्रम राबवून चांगल्याप्रकारे काम करीत आहेत. शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपये पर्यंत व्यवसायासाठी अनुदान मिळणार आहे. याचा सर्व व्यापारीवर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक अजित दळवी यांनी व्यापा-यांसाठी शासनाच्या असलेल्या विविध कर्ज योजनांची सखोलपणे माहीती दिली. या कर्ज योजनेचा जास्तीत जास्त व्यापारी बांधवांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी यावेळी केले. व्यापारी बांधवांच्या कर्ज योजनेबाबतच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. तालुकाध्यक्ष श्री.शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत, सचिव भूषण मठकर व खजिनदार नितीश म्हाडेश्वर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुत्रसंचालन अवधूत शिरसाट यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करून हा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

अभिप्राय द्या..