वेंगुर्ला /-
कासव उपचार केंद्र मालवण तोंडवली येथे न नेता वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे मंजूर करावे,अशी मागणी वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वायंगणी येथे ग्रामपंचायतमार्फत अथवा स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने कासव संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने ‘कासवजत्रा’ सारखा कार्यक्रम आयोजित केला जातो.तसेच स्थानिक ग्रामस्थ व वनविभागाच्या वतीने कासवाची अंडी संरक्षित करुन कासवाच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. त्यामुळे कासव उपचार केंद्र व कासव म्युझियम वायंगणी येथे व्हावे,अशी वायंगणी ग्रामपंचायतची अनेक वर्षांची मागणी आहे.परंतु अनेक वर्षांची मागणी डावलून सदर उपचार केंद्र मालवण तोंडवली येथे नेण्यात येत असल्याचे समजून येते. तरी वायंगणी येथील आमच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून कासव उपचार केंद्र वायंगणी येथे मंजूर करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबत आमदार दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुन्हा कासव उपचार केंद्र वायंगणी येथे आणण्याचे दूरध्वनीवरून आश्वासन दिले आहे ,असे वायंगणी ग्रामपंचायत सरपंच सुमन कामत यांनी सांगितले.यावेळी ग्रा.पं.सदस्य बाळू कोचरेकर उपस्थित होते.याबाबत उपवनसंरक्षक कार्यालय सावंतवाडी यांनाही निवेदन देण्यात आले आहे.