वेंगुर्ला /-
प्राचीन शिलालेख, ताम्रपट यात उल्लेखलेली मूळ संस्कृत भाषेतून उत्पत्ती पावलेली मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रातील साहित्य, तंत्रज्ञान व ज्ञान मराठीत आणले पाहिजे.मराठी भाषा आणि महाराष्ट्रीयन संस्कृती याचे संरक्षण,संगोपन व संवर्धन करण्याचा व्यापक उद्देश ठेऊन वाचनसंस्कृती जपत कुठलेही न्यूनगंड न बाळगता मातृभाषेतून बोलणं हे कोणत्याही भाषेच्या संवर्धनाचे पहिले पाऊल ठरते. आयुष्याच्या सुरुवातीला सहज आत्मसात केलेली भाषा नैसर्गिक क्षमतेचे अधिष्ठान असल्यामुळे मानवी मेंदूत धृवस्थान निर्माण करुन विचार, कल्पना, समस्या निवारण यासाठी प्रभावी साधन ठरते. म्हणून मातृभाषा हेच शिक्षणाचे मुख्य माध्यम असावे. असे जागतिक शिक्षण शास्त्रज्ञ व संशोधक यांचेहि मत आहे, असे प्रतिपादन ज्ञानपीठकार कविश्रेष्ठ पद्मभूषण कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते अँड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल काँलेजचे येथे न्यायवैद्यक शास्त्र विभाग व ग्रंथालया तर्फे आयोजित मराठी भाषादिन कार्यक्रमात कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.
मराठी हि आपली मातृभाषा असल्याने आपापसातील स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला या भाषेचाच आधार घ्यावा लागतो,असे यावेळी प्राचार्य डॉ. के.जी.केळकर यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पुजा कर्पे, ग्रंथपाल निखिता डगरे गोलतकर, महादेव परब, मानस घाग यांनी आपले विचार मांडले.यावेळी व्यासपीठावर डॉ. श्रीराम हिर्लेकर, डॉ.सतीश पाटील, डॉ. संगिता क्षमुळे,डॉ. दिपाली देसाई आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल गोसावी, स्वागत श्रीकृष्ण जानकर, सुत्रसंचालन मैथिली सावंत यांनी आभार मनाली शिवलकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार नार्वेकर, विशाल खांडेकर,जयसुर्या जामकर यांनी विशेष प्रयत्न केले.
कोरोना पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.