मसुरे /-
बिळवस ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या जागेसंदर्भात सातेरी देवालया नजीकच्या व्यासपीठावर आयोजीत ग्रामसभेत बिळवस टेलीफोन केंद्रालगतची जागा निश्चित करण्यात आली. मालवण बेळणे रस्त्यालगत श्रीमती जानकीबाई रामचंद्र पालव ह्या बक्षीसपत्राने विनामुल्य जागा देत असल्याने सदर जागेचे सरपंच यानी लवकरात लवकर बक्षीसपत्र करावे तसेच ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी परीपुर्ण प्रस्ताव करुन शासनाकडे सादर करावा असा ठराव करण्यात आला.
दरम्यान यापुर्वी निश्चित केलेल्या जागी ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी केलेली मागणी व उपसरपंच यानी उपमुख्य कार्यकारी अधीकारी यांचे जवळ केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभुमीवर सदर ग्रामसभेस विशेष महत्व प्राप्त झाले होते. ग्रामसभा विशेष निरीक्षक विस्तार अधिकारी पी.डी.जाधव व ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांच्या सह २८५ ग्रामस्थांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात झाली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ मानसी पालव या होत्या.
१७ जानेवारी २०२० रोजी ग्रामपंचायत इमारत बांधकाम संदर्भात खास ग्रामसभा आयोजीत करण्यात आली होती. सदर सभेमध्ये भोगलेवाडी येथील ग्रामस्थ तातू भोगले यांच्या सर्व्हे नं.५ ही. नं. ३७ मधील ३ गुंठे जागेचे इमारत बांधणे साठी बक्षीसपत्र करणेचा ठराव घेण्यात आला होता. परंतु सदर ग्रामसभेपुर्वी ६ जानेवारी रोजी बिळवस ग्रामस्थानी ग्रामपंचायत इमारती संदर्भात ग्रामपंचायतकडे अर्ज दिला होता. सदर अर्जामध्ये ग्रामपंचायत इमारत ही तिन्ही गावाना सोईस्कर अशा मध्यवर्ती ठिकाणी असावी असे नमुद करण्यात आले होते. परंतु सदर अर्जाचे वाचन ग्रामसभेमध्ये न करता सदर जागेचा ठराव एकतर्फी करण्यात आला. तसेच सदर जागेसंदर्भात सह हिस्सेदारांच्या हरकती ग्रामपंचायतकडे असल्याने सदरच्या जागेचे बक्षीसपत्र कार्यवाही थांबविण्यात येत असल्याचे गटविकास अधीकारी याना तत्कालीन सरपंच यानी कळविले होते. असे असताना १७ जानेवारी रोजी उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली काही मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत नमुद जागेचा ठराव घेण्यात आला होता. परंतु सदरची जागा शासन निर्णय तसेच ग्रामपंचायत अधिनियमायातील तरतुदीमध्ये बसत नसल्याने तसेच बिळवस, आंगणेवाडी, भोगलेवाडी या तीन्ही महसुली गावातील लोकाना अंतराच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी नसल्याने ग्रामस्थांची हरकत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव म्हणाले. त्यामुळे भविष्यात कायदेशीर बाबी उदभवू नयेत यासाठी यापुर्वी बक्षीसपत्र केलेल्या जागेमध्ये ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करणे बाबतचा कोणताही प्रस्ताव करण्यात येऊ नये असा ठराव श्रीकृष्ण रेडकर यानी मांडला, रामकृष्ण पालव यानी अनुमोदन दिले.
मालवण बेळणे रस्त्यालगत बिळवस टेलिफोन कार्यालया लागत श्रीमती जानकीबाई रामचंद्र पालव ह्या बक्षीसपत्राने विनामुल्य जागा देत असल्याने सदर जागी ग्रामपंचायत इमारत उभारण्याचा ठराव अखेरीस घेण्यात आला.कोविड संदर्भात शासनाचे निर्देश पाळताना यावेळी २८५ ग्रामस्थ उपस्थित होते.