नवी दिल्ली /-

मध्य प्रदेशात वनमंत्री विजय शहा यांनी एका गावात कोविड १९ च्या सुरक्षेचं पालन करत चक्क व्यासपीठावरच एका नाभिकाकडून केस कापले आणि दाढी करुन घेतली. इतकचं नाही तर त्या मंत्र्याने या युवकाला स्वयंरोजगारासाठी ६० हजार रुपये मदत जाहीर केली. मंत्री विजय शहा हे गुलाईमाल गावच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी केलेल्या या प्रकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी विजय शहा हे गुलाईमालच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी युवकांना आत्मनिर्भर बनण्याचं आवाहन केले होते. त्यातील एका युवकाला मंत्र्यांनी व्यासपीठावरुन विचारले तु काय काम करु शकतो? तेव्हा तो युवक म्हणाला मी कटिंग-सेविंग चांगल्यारितीने करु शकतो. मला सलून उघडण्याची इच्छा आहे. त्यावेळी या युवकाला विजय शहा यांनी मदतीचं आश्वासन दिले होते.
बुधवारी पुन्हा कॅबिनेट मंत्री विजय शहा गुलाईमाल दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांनी त्या युवकाला व्यासपीठावर बोलावले, या युवकाचं नाव रोहिदास होते. व्यासपीठावर त्यांनी युवकाला सांगितले की, माझी कटिंग आणि सेविंग कर, त्यानंतर युवकाने केस कापण्याचे सामान आणले आणि व्यासपीठावर मंत्री विजय शहा यांचे केस आणि दाढी कापली. यानंतर मंत्र्यांने त्याला ५० हजारांचे सलूनसाठी लागणारे सामान, क्रिम, ब्रश फर्निचर इ. साहित्य दिले. त्याचसोबत १० हजार रुपये रोख दिले आणि सांगितले आता, जा आणि आत्मनिर्भर हो, काही अडचण आली तर मला सांग असं युवकाला सांगितले.

याबाबत मंत्री विजय शहा म्हणाले की, कोरोनामुळे लोक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. काही महिन्यांपासून अनेकांच रोजगार गेलेत. लोकांमध्ये विश्वास जागवण्यासाठीच मी सर्वांसमोर युवकाकडून केस आणि दाढी कापून घेतली. आवश्यक उपाययोजना करुन केस कापणे सुरक्षित आहे हे दाखवून दिले. मी या युवकाला मदत केली आणि तो स्वत: आत्मनिर्भर होऊन सलून उघडू शकेल असं ते म्हणाले.
दरम्यान, युवकांनी स्थानिक बाजारात भाजी, कपडे, बांगड्या, चप्पला-बुटे यासारखे छोटे व्यवसाय सुरु केले पाहिजेत. या व्यवसायासाठी सरकार बँकांच्या माध्यमातून युवकांना १० हजार रुपये कर्जही उपलब्ध करुन देईल. युवकांना फक्त कर्जाची मूळ रक्कम परतफेड करायची आहे तर कर्जावरील व्याज सरकार भरेल असंही मंत्री विजय शहा यांनी युवकांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page