आचरा /-
निविदा प्रक्रिया पुर्ण होऊनही आचरा गावातील रस्त्यांची कामे अजूनही सुरू झाली नाही आहेत.त्यामुळे येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास आचरा तिठा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा आचरा ग्रामस्थांतर्फे जगदीश पांगे यांनी दिला आहे
आचरा गावातील आचरा बंदर रोड,आचरा भगवंत गड,हिर्लेवाडी, मिराशी वाडी,पिरावाडी जेटी आदी रस्त्यांची निविदा प्रक्रिया झाल्याचे पांगे यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले आहे.सदर रस्त्यांची पुर्णतः दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे.त्यामुळे वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.येत्या पंचवीस फेब्रुवारी पासून सुरू होणा-या डाळपस्वारीत नेहमीच्या रहदारी पेक्षा वाहतूकीत वाढ होणार आहे.त्यामुळे मंजूरी मिळूनही रस्त्यांची कामे सुरू होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.या पार्श्र्वभूमीवर येत्या आठ दिवसात तातडीने काम सुरू न झाल्यास आचरा तिठा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा जगदीश पांगे यांनी दिला आहे.