दोडामार्ग /-
कसई दोडामार्ग नगरपंचायत चा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या त्या ठिकाणी प्रशासन कारभार सांभाळत आहे मात्र यात प्रशासनाचा दुर्लक्षपणा आणि वेळकाढू धोरण हे येथील नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी नुकसान कारक बनत आहे, अनेक शासकीय कामांसाठी रहिवासी दाखले आवश्यक असताना या ठिकाणी मात्र टोलवाटोलवी करून संबंधित अधिकारी हे रहिवासी दाखले देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे नागरिकात असंतोष असून त्यांनी माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे उपजिल्हाध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज दोडामार्ग नगरपंचायत मध्ये धाव घेत नगरपंचयात मधून लवकरात लवकर रहिवासी दाखले मिळावे यासाठी निवेदन दिले.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, संबंधित यंत्रणाही टोलवा टोलवी करत असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विविध शासकीय कामांसाठी दाखल्याची आवश्यकता असताना ते दाखले तलाठी, पोलीस पाटील यांच्यामार्फत मिळतील असे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगितले जाते हे कुठेतरी थांबणे गरजेचे असून नगरपंचायत प्रशासनाकडून रहिवासी तसेच इतर विविध दाखले हे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी चेतन चव्हाण यांसह प्रमोद कोळेकर, समीर रेडकर, विष्णू रेडकर, नितीन मणेरीकर, विष्णू म्हावळणकर, संदेश म्हावळणकर, सागर चांदेलकर, विनेश म्हावळणकर, सुधीर पनवेलकर, आदी उपस्थित होते.