कणकवली /-

नवीन कुर्ली गावातील भाजपाप्रणित काही लोकांनी २६ जानेवारी रोजी गावच्या ग्रामपंचायतीसाठी पुकारलेल्या उपोषणाशी गावाचा काही सबंध नाही. गावची ग्रामपंचायत व्हावी असे याना खरेच वाटत असते तर यांचे नेते नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि २० वर्ष सत्तेत असताना, बराच कालावधी जिल्ह्याचे पालकमंत्री असतानां त्यांच्याकडून यांनी ग्रामपंचायत मंजूर करून का नाही आणली. किंबहुना यांच्या नेत्यांनी आजपर्यंत ग्रामपंचायत होण्यासाठी काहीच का नाही केले असा प्रश्न नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केला आहे.

नवीन कुर्ली विकास समितीची सभा अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पिळणकर यांच्या निवास्थानी पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सेनापती रामचंद्र सावंत, सचिव सुनील निवृत्ती गोसावी, सहसचिव रघुनाथ चं. कुलकर्णी, प्रकाश शिवराम मडवी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणाले, गावची ग्रामपंचायत व्हावी याकरता नवीन कुर्ली विकास समितीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी ग्रामपंचायत मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी या उपोषणाचा घाट घातला गेला आहे. दरम्यान या उपोषण करणाऱ्यांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री असताना कुर्ली गावात धरण झाले. फोंडा गावात या गावचे विस्थापन झाले. त्यानंतर ते राज्यात महसूल मंत्री, उद्योग मंत्री अशा महत्वाच्या पदावर होते. २० वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र त्यांना गावची ग्रामपंचायत झाली पाहिजे असे का नाही वाटले ? हा प्रश्न त्यांच्या या लोकांनी त्यांना कधी विचारला आहे हा ? त्यांच्या ताब्यात येथील सत्तेची केंद्रस्थान आहेत. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी ६ वर्ष आमदार आहेत. त्यांनी का नाही हा प्रश्न मार्गी लावला असे प्रश्नही अनंत पिळणकर यांनी यावेळी केला.

कुर्ली गावात ३५७ हे बाधित शेतकरी असून त्यांना अजूनही पर्यायी शेतजमीन मिळालेली नाही. गावातील याच लोकांनी येथील ६३ लोकांचे फॉर्म भरून घेत ६५ टक्के रक्कमेतून भूखंड मिळविण्याकरिता केससाठी प्रत्येकी ८५०० रुपये गोळा करून घेतले. यावेळी जमा झालेल्या लाखो रुपये रक्कमेचे काय झाले ? लोकांना न्याय मिळाला का ? आता उपोषणासाठी लोकांकडून ५०० व १००० हजार का जमा केले जात आहेत ? असा पप्रश्न करताना लोकहिताची कामे करताना लोकांकडून पैसे का गोळा करावे लागतात असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला.

लगतच्या लोरे गावातील तुळशीदास रावराणे आणि त्यांचे चिरंजीव गावचे सरपंच होते आणि दोघेही तालुक्याचे सभापती झाले. मात्र येथील लोकांची नेतेगिरी करताना यांच्या ग्रामपंचायतीचे ठराव नवीन कुर्ली गावातील ग्रामपंचायत होण्याबाबत काय सांगतात ? हा प्रश्न आमच्या गावातील या उपोषण करणाऱ्या लोकांनी कधी त्यांना विचारला आहे का ? असा प्रश्न करताना आमची नवीन कुर्ली विकास समिती गेली २५ वर्ष कार्यरत आहे. यातील १२ वर्ष मी स्वतः अध्यक्ष आहे. या समितीच्या नावानेच शासन स्थरावर ग्रामपंचायतीसाठी पत्रव्यवहार सुरु आहे. त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या गावातील ग्रामपंचायत लवकरच अस्तित्वात येईल. असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page