उपविभागप्रमुख मिलिंद नाईक यांचा उपोषणाचा इशारा..
दोडामार्ग/-
विरोधकांनी दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांसाठी अनेक आंदोलने केली यावर खड्डे बुजवण्या पलीकडे कोणतीही कारवाई बांधकाम विभागाने केली नाही. भरलेले खड्डे उखडले तर दोडामार्ग बांदा राज्य मार्गावरील सासोली मंदार हॉल जवळील रस्ता हा तात्पुरत्या डांबरीकरणाने सुस्थितीत करण्याचा प्रयत्न झाला मात्र निकृष्ठ दर्जाचे काम हे या रस्त्याची मोठी डोकेदुखी ठरत असून हा रस्ताही उखडल्याने याठिकाणी पुन्हा खड्डे पडण्याचा धोका दिसतो आहे.या विरुद्ध आता सत्ताधारीही बांधकामच्या या कामावर नाराजी व्यक्त करत आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात असल्याचे दिसत आहेत.
महाविकास आघाडी शासन भरघोस निधी देतो पण बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याने हा निधी योग्यरितीने खर्च होताना दिसत नसल्याचा आरोप करत येत्या आठदिवसातहा रस्ता न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे मणेरी उपविभागप्रमुख मिलिंद नाईक यांनी दिला आहे. मात्र विरोधकांबरोबर शासनकर्तेही अशाप्रकारे आंदोलनाची भाषा करू लागल्याने सामान्य जनतेला न्याय कोण देणार? हा प्रश्न मात्र याठिकाणी अनुत्तरित राहत आहे.