वेंगुर्ला /-
वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आयोजित साई दरबार हॉल येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे उदघाटन आज नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते
दीपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल,स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर,आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक रमेश मिश्रा, सतीश गिरप,दिनकर कांबळे, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी प्रथम न.प. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपत्ती,आपत्ती व्यवस्थापन या बाबत माहिती दिली.त्यांनतर प्रशिक्षकांमार्फत शहरातील संभाव्य आपत्ती व त्यावरील उपायोजना याबाबत माहिती देण्यात आली.आपत्ती दरम्यान शोध व बचाव पद्धत, बाधीत व्यक्तींना प्रथमोपचार कशाप्रकारे देता येतो,याबाबत विस्तृत माहिती व प्रात्यक्षिक देण्यात आले.तसेच दुपारच्या सत्रात प्रथमोपचाराची सीपीआर ,आपत्कालीन परिस्थितीत वापरता येणाऱ्या दोरीच्या विविध गाठी, बाधित वक्तींना उचलण्याच्या सुरक्षित व योग्य पद्धती, चादर बांबू सारख्या मुबलक वस्तूंपासून स्ट्रेचर तयार करणे आणि विविध इजांसाठी प्रथमोपचराच्या मलमपट्टी पद्धती यांची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.
दरम्यान वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आज व उद्या दोन दिवशीय या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रशिक्षणामध्ये शहरातील सर्व कार्यालयांचे एक कर्मचारी आणि नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच पदाधिकारी सहभागी झाले आहेत. सदरचे प्रशिक्षण हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षकांमार्फत देण्यात येत आहे.