संगनमताने केलेल्या शासननिधी अपहार प्रकरणी संबंधितांवर कारवाईस एवढा विलंब का होतोय..?

जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी या भ्रष्ट कारभाराची दखल घेणार का…मनसेचा सवाल..?

कुडाळ /-

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 उपक्रमात कुडाळ सांगवडे येथील इमारत क्रमांक 4056 भूसंपादन मोबदला प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग व मांगीलाल परमार यांनी खोटा व बनावट प्रस्ताव बनवून संघटितपणे भ्रष्टाचार करत शासनाचे 47 लाख 11 हजार रुपये मोबदला रक्कम हडपल्या प्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी सादर आहेत.मात्र त्यावर अद्याप फौजदारी प्रकारची कारवाई होत नाही हे पाहता महसूल प्रशासनच अशा भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे.एकीकडे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त हक्काच्या मोबदल्यासाठी तीन वर्षाहून अधिक काळ शासनाकडे याचना करत आहेत,वारंवार आंदोलने करत आहेत तर दुसरीकडे खोटे बनावट प्रस्ताव तात्काळ मंजूर होऊन शासनाचे पैसे लाटले जातात ही खरी शोकांतिका आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व अन्य लोकप्रतिनिधी याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत हे जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल.प्रत्यक्ष भूसंपदनात इमारत नसताना देखील बांधकाम व भूमी अभिलेख विभागाकडून खोटे अहवाल दिले गेले हे उघडपणे सिद्ध झाले असून त्यावर कारवाई केली जात नाही हे पारदर्शी कारभारास काळीमा फासणारे आहे. शिवाय महसूलचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी मुक गिळून गप्प बसतात या पाठीमागे नेमके कोणते हात व कोणाचे हितसंबंध दडलेले आहेत याचा विचार आता जनतेनेच करायची वेळ आली आहे.त्यामुळे या गंभीर प्रकरणात आता जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तात्काळ कारवाईचे आदेश निर्गमित करावेत अन्यथा जिल्हा प्रशासन भ्रष्ट कारभाराबाबत गंभीर नसून व भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा चुकीचा संदेश जनतेमध्ये जाण्याची भीती आहे.यामुळे भविष्यात भ्रष्टाचार वाढीस लागून अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होतील अशी भीती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी आज मीडिया शी बोलताना व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page