मालवण /-

चिवला बीचच्या समुद्रात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न एका पर्यटकाने केला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेत त्या पर्यटकाला समुद्रातून बाहेर काढले. याची माहिती संबंधित पर्यटक व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पोलिसांनी दिली. त्यानुसार आज पोलिस ठाण्यात आलेल्या नातेवाईकांच्या ताब्यात त्या पर्यटकाला स्वाधीन करण्यात आले.
दरम्यान समुद्रात उडी मारून जीव देणार्‍या पर्यटकाचा जीव वाचविण्याचे काम केलेल्या स्थानिक पर्यटन व्यावसायिक तरूणांना पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांनी गौरविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिवला बीच येथील समुद्रात दुपारी दोन वाजल्यापासून एक व्यक्ती उतरली होती. सायंकाळच्या वेळेस या व्यक्तीने पुन्हा समुद्रात उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार स्थानिक पर्यटन व्यावसायिक सचिन गोवेकर, महादेव वेंगुर्लेकर, गुरू वेंगुर्लेकर, हेमंत सारंग, दाजी जोगी यांच्या लक्षात येताच त्यांनी समुद्रात धाव घेत त्या पर्यटकाला समुद्रातून बाहेर काढत किनार्‍यावर आणले. या प्रकाराची माहिती त्यांनी पोलिस ठाण्यास दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर, गृहरक्षक दल जवान परशुराम आंगचेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तीची माहिती घेतली असता त्याचे नाव दीपक भीमराव खंडाईत (वय-४७) रा. अतित जिल्हा-सातारा असे समजले. त्यानुसार पोलिसांनी सातारा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून कोरेगाव पोलिस ठाण्यास माहिती दिली. त्यानंतर दीपक खंडाईत ज्या गावात राहतात त्या गावातील व्यक्तींशी संपर्क साधून नातेवाईकांची माहिती घेत त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार आज दुपारी खंडाईत यांचा भाऊ तसेच अन्य नातेवाईक येथील पोलिस ठाण्यात दाखल झाले. सर्व कार्यवाही पूर्ण करत पोलिसांनी दीपक खंडाईत यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
चिवला बीच समुद्रात जीव देण्याचा प्रयत्न करणार्‍या पर्यटकाचा जीव वाचविणार्‍या स्थानिक तरूणांचा पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. ओटवणेकर म्हणाले, पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा जीव वाचविण्याचे मोठे काम स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी केले आहे. एखाद्या पर्यटकावर आपत्कालीन परिस्थिती ओढविल्यास स्थानिक पर्यटन व्यावसायिकांकडून असे कार्य घडणे हे पोलिस अधीक्षकांनाही अपेक्षित आहे. चिवला बीच येथे काल घडलेल्या या घटनेनंतर संबंधित पर्यटकाचा जीव वाचविण्याचे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय असेच आहे. यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांबद्दलची चांगली भावना राज्यभरातून येणार्‍या पर्यटकांपर्यत पोचली आहे. यापुढेही स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी आपत्कालीन परिस्थितीत असेच सहकार्य द्यावे अशी अपेक्षा श्री. ओटवणेकर यांनी व्यक्त केली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक भारत फार्णे, पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page