सिंधुदुर्गनगरी /-
जिल्ह्यातील 30 वर्ष जुन्या सर्व शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल व सेफ्टी ऑडिट करावे अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कोरोना व लसीकरणा संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. संदेश कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
इमारतींचे ऑडिट हे मोफत करण्यासाठी शासकीय तंत्र निकेतनच्या प्राचार्यांना सांगून ऑडिट करून घ्यावे अशा सूचना देऊन पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील 5 नगर पंचायतींना आणि ओरोस प्राधिकरणासाठी मिनी अग्निशमन यंत्रणा देण्यात यावी. जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघामध्ये विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा. चिपी विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज आहे. विमानतळावरील विमानाचे उड्डाण म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची उड्डाण असणार आहे. त्यामुळे कोणीही श्रेयवाद न करता, एकत्र येऊन या उद्घाटनाचे स्वागत करावे. श्रेयवादावरून जिल्ह्याचा मागे नेणे चांगले नाही. विमातळासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातूनही निधी देण्यात आला आहे. लवकरात लवकर विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असून येत्या 17 जानेवारीला स्वतः चिपी विमानतळाची पाहणी करणार आहे. 13 जानेवारीला डिजीसीआयची टिम विमातळाच्या पाहणीसाठी येणार आहे. वैद्यकिय महाविद्यालय व लसीकरणासाठी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. पाडगांवकराच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला असून त्यासाठी 1 कोटी 50 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 17 जानेवारी रोजी जिल्ह्यातील विकासकामांसदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. त्यावेळी जिल्हा मुख्यालयामध्ये ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण व मुख्यालयामध्ये 30 मीटर उंचीचा तिरंगा उभारण्याविषयीही अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.
16 जानेवारी रोजी पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाबाबत प्रशासन व आरोग्य विभाग यांनी सर्व ती यंत्रणा तयार ठेवावी असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, पहिल्या फेरीमध्ये जिल्ह्यातील 9434 डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. या मध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचाही समावेश आहे. तसेच काही खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी अजून नोंदणी केली नसल्याने हा अकडा वाढू शकतो. तर दुसऱ्याटप्प्यामध्ये पोलीस व नंतर प्रशासन आणि 50 वर्षावरील नागरिक तसेच इतर आजार असणारे यांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय, ओरोस, सावंतवाडी, कणकवली आणि शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला व मालवण येथील ग्रामिण रुग्णालय यांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी दिवसाला 100 जणांचे लसिकरण या प्रमाणे जिल्ह्यात एकूण दिवसात 600 जणांचे लसीकरण करता येणार आहे. प्रशासनाने कमीत कमी वेळात लस देता येईल असे नियोजन करावे. त्याशिवाय जिल्ह्यातील 20 मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये व्यायामशाळा उभारावी, कचरा उचलण्यासाठी त्यांना घंटा गाडी देण्यात यावी, पोलीस विभागाला एस्कॉर्टिंगसाठी 5 गाड्या द्याव्यात. आंबोली येथील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी 52 लाखांचा निधी द्यावा. हा सर्व निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, मल्सीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर पालिकांचा निधी व जिल्हा नियोजन समितीचा विभागवार निधी यांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू वॉर्डला भेट देऊन पहाणी केली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लसीकरण यासाठीच्या तयारीची पाहणी केली.