व्यसनी उमेदवाराला मतदान करू नये.;व्यसन मुक्त महाराष्ट्र मंच यांचे मतदारांना आवाहन..

व्यसनी उमेदवाराला मतदान करू नये.;व्यसन मुक्त महाराष्ट्र मंच यांचे मतदारांना आवाहन..

वैभववाडी/-

ग्रामपंचायत म्हणजे लोकशाही शासन प्रणालीची पहिली पायरी मानली जाते. ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणजे गाव पातळीवरील लोकशाही प्रशासनाचा मंत्रीच असतो. त्यामुळे गावाचा विकास या ग्रामपंचायतरुपी सदस्यांच्या हाती असतो. राज्यभरातुन होणा-या ग्रामपंचायत निवडणुकीत दारु पाजणा-या व व्यसन करणा-या उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन व्यसन मुक्त महाराष्ट्र मंच आणि महाराष्ट्र अंनिसने केले आहे.
राज्यभरातुन हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीमध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील एक-दोन महिन्यांमध्ये होत आहेत. कोणत्याही निवडणुकीत व्यसन करण्याची फँशन रुढ झालेली आहे. दारुसारख्या व्यसनामुऴे गावागावांत भांडणतंटे व अशांततेचे वातावरण पाहावयांस मिळते. दारु पाजणे, पार्ट्या देणे व विविध प्रकारची मतदारांना आमिषे दाखविली जातात. या आमिषांना बळी पडल्यामुळे गुंड प्रवृत्तीचे व भ्रष्ट आचार, विचारांचे उमेदवार निवडुन येण्याची दाट शक्यता असते. परंतु जर का त्या गावातील महिला व सुज्ञ नागरिकांनी एकत्र येवुन व दारु पाजणा-या व दारु पिणा-या उमेदवारांना मतदान करणार नाही. अशी ठाम भुमिका जाहीर केल्यास उमेदवारांवर याचा नैतिक दबाव नक्कीच पडतो. यामुळे मते न मिळण्याची भिती उमेदवाराला असते.

या निवडणुकींच्या काळातच अनेक तरुण मुले पहील्यांदा दारुचा घोट घेतात. शिवाय त्यांना त्यासाठी स्वतःचे पैसेही खर्च करावे लागत नाहीत. म्हणून अश्या आमिषाला बळी पडल्यामुळेच पुढे आयुष्यभर न सुटणारे व्यसनाचे शिकार होऊन आयुष्याची राखरांगोळी झालेल्या हजारो घटना समोर आल्या आहेत. कुटुंबात कलह होणे, आर्थिक नुकसान होउन कर्जबाजारी होणे, शारीरीक, मानसिक आजार जडणे अश्या अनेक समस्या पुढील आयुष्यात निर्माण होत असतात.

यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांना याद्वारे विनंती व आवाहन करण्यात येते की, त्यांनी दारु पाजणा-या, दारु पिणा-या व आमिष दाखविणा-या उमेदवाराला मतदान करु नये असे आवाहन करीत आहोत.अश्या प्रकारचे कुठलेही,आमिष दाखविने हा निवडणुक अधिनियमाद्वारे गुन्हा देखील ठरतो. म्हणून अश्या प्रकारचे कुठलेही आमिष उमेदवाराने दाखवु नये व आमिष दाखविणा-या उमेदवाराला सुज्ञ मतदारांनी मतदान करु नये असे आवाहन व्यसन मुक्त महाराष्र्ट समन्वय मंचचे निमंत्रक व महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास व समिती सदस्य प्रा.एस.एन पाटील यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..